आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छतागृहांअभावी नागरिकांची मोठी गैरसोय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - विविध वस्तूंच्या खरेदीसाठी परगावचे नागरिक मोठ्या संख्येने नगरला येतात. शहरात विशेषत: बाजारपेठांत सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या कमी असल्याने येणा-या नागरिकांची मोठी गैरसोय होते. कोपरे, बोळी व कॉलनीतील आडोशांना ते नैसर्गिक विधी उरकत असल्याने तेथे सतत दुर्गंधी सुटलेली असते.
नगरचा कापडबाजार, सराफाबाजार तसेच भांडीबाजार राज्यात प्रसिद्ध आहे. त्यासाठी व्यापारी व ग्राहकांचे येथे सतत येणे-जाणे असते. बसस्थानक, रेल्वेस्थानक, महापालिका, गांधी मैदान, तोफखाना, न्यू आर्ट्स महाविद्यालयासमोर अशी काही ठिकाणे सोडली, तर चांगले सार्वजनिक स्वच्छतागृह शहरात नसल्याने नागरिकांची कुचंबणा होते. महिलांची तर मोठी गैरसोय होते.
कापडबाजार, घासगल्ली, चितळे रस्ता, कोर्ट परिसर, दिल्ली दरवाजा या गजबजलेल्या ठिकाणी स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांना लघुशंकेसाठी आडोशाची शोधाशोध करावी लागते. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. दिल्लीगेट परिसरात नागरिकांची नेहमीच गर्दी असते. नागरिक लघुशंकेसाठी सिद्धीबागेत जातात. त्याचा त्रास व्यावसायिक व रहिवाशांना सहन करावा लागतो.
कापडबाजारात स्वच्छतागृह हवे - कापडबाजारात रोज हजारो नागरिक येतात. त्यात ग्रामीण भागातील नागरिकही मोठ्या प्रमाणात असतात. लघुशंके साठी त्यांना स्वच्छतागृहाची शोधाशोध करावी लागते. नव्याने येणा-यांची तर चांगलीच तारांबळ उडते.कापडबाजारात स्वच्छतागृहाची आवश्यकता आहे.- रमेश मुथा, व्यावसायिक, कापडबाजार
बांधकाम विभागाची जबाबदारी - स्वच्छतागृहांच्या देखभालीची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागाची आहे. मात्र, नवीन स्वच्छतागृहे उभारण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे. - डॉ. अनिल बोरगे, आरोग्याधिकारी