आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगणवाडीतील मुलांची शौचालयाविना कुचंबणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात 4 हजार 792 अंगणवाड्या असून यातील अवघ्या 2 हजार 725 अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारती आहेत.

बाकी सर्व अंगणवाड्या उघड्यावर किंवा भाड्याच्या खोलीत, ग्रामपंचायत इमारतीत, समाजमंदिरात, शाळेच्या खोलीत भरतात. यापैकी 80 टक्के इमारतींत शौचालयाची, तर कित्येक अंगणवाड्यांत पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे अंगणवाडीत शिकणार्‍या सुमारे चार लाख बालकांची कुचंबणा होत आहे.

अंगणवाड्यांसाठी 176 पर्यवेक्षिका,4 हजार 622 मदतनीस व 4 हजार 751 सेविका आहेत. 505 अंगणवाड्या उघड्यावर, 446 भाड्याच्या खोलीत, 244 समाजमंदिरात, 479 शाळेच्या खोलीत, 296 ग्रामपंचायत कार्यालयात, तर 97 अंगणवाड्या इतरत्र भरतात. अंगणवाड्यांत लहान बालके सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत थांबतात. त्यांना पोषक आहार व अनौपचारिक शिक्षण दिले जाते. पाच तासांच्या कालावधीत बालकांना लघुशंका आणि शौचास जावे लागते, पण बहुतांशी अंगणवाड्यांत शौचालयाची सोय नसल्याने बालकांची गैरसोय होते. त्यांना उघड्यावरच बसावे लागते.

ज्या काही थोड्याफार अंगणवाड्यांना शौचालये आहेत, त्यातील कित्येकांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे बालकांसह अंगणवाडी सेविका व मदतनिसांचीही कुचंबणा होत आहे.