नगर - दक्षिण आशियाई स्तरावरील युवा एकात्मता व शांतता शिबिर ३ ते ७ फेब्रुवारीदरम्यान नगरमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात देशातील सर्व राज्यांबरोबर श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळमधील सुमारे ४०० युवक-युवती सहभागी होणार आहे. यानिमित्ताने देशाच्या सांस्कृतिक एकात्मतेचं दर्शन नगरकरांना घडेल.
'युवान' संचालित डॉ. एस. एन. सुब्बराव युवा सक्षमीकरण केंद्राच्या पुढाकाराने होणा-या या शिबिराचे उद्घाटन ३ फेब्रुवारीला सायंकाळी चार वाजता ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे व डॉ. सुब्बराव यांच्या प्रमुख उपस्थितीत बडी साजन मंगल कार्यालयात होईल. शिबिरात श्रमदान, गटचर्चा, चर्चासत्र, तसेच विविध राज्यांतील सांस्कृतिक कार्यक्रम होतील. माळीवाडा बसस्थानक व रेल्वेस्थानक परिसर सामूहिक श्रमदान करून स्वच्छ करण्यात येईल. ४ फेब्रुवारीला सायंकाळी ४ वाजता वाडिया पार्कमधील महात्मा गांधी पुतळ्यापासून माणिक चौकापर्यंत शांतता रॅली काढण्यात येईल. नंतर तेथे सर्वधर्म प्रार्थना व सांस्कृतिक कार्यक्रम होतील. ५ फेब्रुवारीला प्रेमदान चौक ते भिस्तबाग चौक अशी शांतता रॅली निघून तिच्या समारोपानंतर भिस्तबाग चौकात कार्यक्रम होईल. ६ फेब्रुवारीला लष्कराच्या सहकार्याने एसीसी अँड एसच्या ऑडिटोरिअममध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होतील. या दिवशी शिबिरार्थींच्या भोजनाची व्यवस्था लष्कराच्या वतीने करण्यात आली आहे, अशी माहिती संयोजक संदीप कुसळकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
शिबिराचा समारोप ७ फेब्रुवारीला राळेगणसिद्धी येथे होणार आहे. डॉ. सुब्बराव यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त या दिवशी थॅलेसेमियाग्रस्तांसाठी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पद्मावती मंदिर परिसरात होणा-या या कार्यक्रमास अण्णा हजारे, डॉ. चंद्रशेखर धर्माधिकारी, नगरचे माजी जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश उपस्थित राहणार आहेत. शिबिरातील अनेक कार्यक्रम नगरकरांसाठी खुले आहेत.पत्रकार परिषदेस डॉ. सईद काझी, हेमंत लोहगावकर, नरेंद्र वडगावकर, सुरेश मैड, प्रसाद जोशी आदी उपस्थित होते.
पुढे वाचा राष्ट्रपतिपदालाही नकार दिला डॉ. सुब्बराव यांनी