आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पन्नास हजार काळे झेंडे फडकावून होणार निषेध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर शहरात २३ ला निघणाऱ्या मराठा क्रांती मूकमोर्चात मोर्चात सहभागी होणाऱ्यांच्या हातात काळे भगवे झेंडे देण्यात येणार आहेत. त्यासाठी दोन्ही रंगांचे प्रत्येकी ५० हजार झेंडे तयार करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांनी दिली. निषेध म्हणून काळे झेंडे फडकावण्यात येणार आहेत. याशिवाय मोर्चाची भूमिका मांडण्यासाठी संयोजकांनी बुधवारी १०३ मुलींच्या मुलाखती घेऊन १५ मुलींची निवड केली. त्यापैकी पाच मुली सोलापूर रस्त्यावरील चांदणी चौकात मागण्यांचे निवेदन वाचणार आहेत.
या मोर्चाची नगर शहरात जय्यत तयारी सुरू आहे. आतापर्यंतच्या मोर्चांचे उच्चांक मोडण्याचा संयोजकांचा निर्धार आहे. त्यादृष्टीने बुधवारी ओम मंगल कार्यालयात बैठक झाली. सहभागी होणाऱ्या प्रत्येकास टी-शर्ट नाश्त्याचे पाकिटही देण्यात येणार असल्याचे या बैठकीत जाहीर करण्यात आले. या मोर्चासाठी जिल्हाभरातून घराघरातून महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने बाहेर पडणार आहेत. युवकांनी पायाला भिंगरी बांधून जास्तीत जास्त लोकांना या महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. माजी प्राचार्य खासेराव शितोळे, संजय कळमकर अजय बारस्कर महाराज यांनी १०३ मुलींच्या मुलाखती घेतल्या. त्यापैकी १९ मुलींची भूमिका मांडण्यासाठी निवड करण्यात आली. त्यातील नऊ जणी व्यासपीठावर बसतील सहा जणी निवेदन देण्यासाठी जाणार आहेत. या मुलींची निवड करताना त्यांचे विचार, माहिती वक्तृत्व कौशल्य जाणून घेण्यात आले. यापैकी एकच मुलगी मुख्य निवेदन वाचणार आहे.

मराठा डॉक्टर
देणार विनामूल्य सेवा
मोर्चासाठी येणाऱ्या नागरिकांना सुविधा देण्यासाठी विविध संघटनांनी पुढाकार घेतला आहे. मराठा डॉक्टरांकडून एक दिवस मोफत आरोग्य सेवा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. गावाेगावी मोर्चाचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. वाहनांवरही मोर्चाचे स्टिकर लावण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही २३ मार्चला मोर्चासाठी सुटी जाहीर करण्याचा ठराव घेण्यात आला. अहमदनगर एज्युकेशन सोसायटी, आबासाहेब काकडे, जनता, जिल्हा मराठा विद्याप्रसारक यासह विविध संस्थांनी सुटी जाहीर केली आहे. मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांची संख्या विक्रमी असेल, असा अंदाज बांधला जात आहे. सध्या सुरू असलेल्या जय्यत तयारीवरून हा अंदाज खरा ठरणार असल्याची संयोजकांना खात्री आहे. चहाच्या टपरीपासून सर्वत्र मराठा क्रांती मोर्चावर चर्चा होताना सध्या दिसते आहे.

जिल्हाभरातून येणाऱ्या मोर्चेकऱ्यांच्या दुचाकी चारचाकी वाहनांसाठी शहरापासून काही अंतरावर आठ मोठ्या वाहनतळांचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातून जाणाऱ्या महामार्गावरही ड्रॉप पॉईंट आहेत. तेेथून पुढे वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. मोर्चातील लाखोंचा जनसमुदाय विचारात घेऊनच वाहतुकीचे नियोजन करण्यात येत आहे. मोर्चाच्या मार्गावर भोंगे लावण्यासाठी ३५ उंच टॉवर उभे करण्याचे काम सुरू झाले आहे. महिला मोर्चेकरी वाडिया पार्क मैदानावर जमणार आहेत, तर पुरुष सर्व स्टेट बँक चौकमार्गे मोर्चात सहभागी होणार आहेत. मार्गावरून एका बाजूने महिला, तर दुसऱ्या बाजूने पुरुष मार्गस्थ होतील.

वांबोरीतून दहा हजार लोक येणार
सकल मराठा क्रांती मोर्चासाठी वांबोरीत जय्यत तयारी झाली आहे. गावात ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहे. गावातून सुमारे दहा हजार नागरिक मोर्चासाठी नगरला येणार आहेत, अशी माहिती मोर्चात सहभागी होणाऱ्या युवकांनी दिली.

शहरात कडेकोट सुरक्षा
मोर्चाच्या मार्गावर दर शंभर मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत. त्यांचे काम सुरू आहे. कार्यकर्त्यांकडे २५ वॉकीटॉकी संचही असणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत अनुचित प्रकार घडणार नाही, याची कडेकोट तयारी सुरू आहे.

एकलाख फ्लेक्स
या मोर्चासाठी शहर जिल्ह्यात जोरदार वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हाभर आतापर्यंत एक लाख फ्लेक्स लावण्यात आल्याची माहिती संयोजकांनी दिली. याशिवाय दहालाख स्टिकर्सही वाहन दर्शनी भागात लावण्यात आले आहेत.

सोशल मीडियाचा प्रभावी वापर
मोर्चाला अवघा एक दिवस उरला आहे. स्वयंस्फूर्तीने सोशल मीडियावर युवक मोर्चाचे नियोजन माहिती देत आहेत. या मोर्चाच्या निमित्ताने व्हॉटस अॅप फेसबुकचा प्रभावीपणे वापर होत आहे. अफवांवर विश्वास ठेवता जातीय तणाव निर्माण होणार नाही, याचीही खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

मनपाची स्वच्छतागृहे
मराठा मोर्चात मोठ्या प्रमाणावर महिला सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर नगर शहरातील स्वच्छतेबाबत, तसेच इतर उपाययोजनांबाबत महापौर सुरेखा कदम यांनी मनपातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांसाठी फिरते स्वच्छता गृहे, फिरता दवाखाना आदी सुविधा देण्यात येणार आहेत, तशा सूचना महापौर सुरेखा कदम यांनी दिल्या आहेत.

चहा नाश्त्याची सोय
मोर्चाला येणाऱ्यांसाठी ठिकठिकाणी चहा नाश्त्याची सोय स्वयंस्फूर्तीने करण्याची तयारी करण्यात येत आहे. उत्तर नगर जिल्ह्यातील मोर्चेकरी मनमाडमार्गे येणार असल्याने पुढे सावेडी बसस्थानक येथे सावेडी ग्रामस्थांच्या वतीने वाहनतळ तयार करण्यात आले आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी सुमारे १० हजार स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने पुढे आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...