आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top Leaders In District Cooperative Bank Elections

जिल्हा सहकारी बँकेसाठी लागणार दिग्गजांचा कस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी शनिवारपासून (४ एप्रिल) उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होत आहे. आशिया खंडात नावलौकिक राज्यात अव्वल स्थान राखून असलेल्या बँकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी जिल्ह्यातील दिग्गज नेते आमने-सामने येणार आहेत. बदलत्या राजकीय घडामोडींचा परिणाम या निवडणुकीत जाणवणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँकेच्या सत्ताकारणात काँग्रेस अंतर्गत असलेल्या दोन गटांत सध्या चुरस आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात ही चुरस आहे. सध्या थोरात गटाकडे बँकेची सत्तासूत्रे आहेत. राष्ट्रवादी भाजपला सोबत घेऊन त्यांनी बँकेवर वर्चस्व मिळवत विखे गटाला सत्तेपासून दूर ठेवले. तत्पूर्वीची पाच वर्षे सत्ता विखे गटाकडेच होती. स्वत: विखे यांनी बँकेचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपचे जिल्ह्यातील बळ वाढले आहे. या निवडणुकांचा सहकारी संस्थांवर किंचितही परिणाम झाला नसल्याचे चित्र सहकारी साखर कारखाने इतर संस्थांच्या निवडणुकीतून पुढे आले आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीच्या परिणामांकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विखे थोरात गटाकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. भाजप आघाडीतही गुप्त खलबते सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही मोर्चेबांधणी सुरू आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी प्राधिकरणाच्या स्थापन करण्यास झालेल्या विलंबामुळे आताच्या संचालक मंडळाला मुदतवाढीचा फायदा मिळाला.

थोरात गटाला साथ देणा-या भाजपची यावेळी वेगळी भूमिका अपेक्षित आहे. त्याला कारणेही तशीच आहेत. पूर्वाश्रमीचे सहकारातील सक्रिय नेते विधानसभेत भाजपसमवेत आले आहेत. त्यातील मोनिका राजळे, स्नेहलता कोल्हे या विधानसभेत पोहोचल्या आहेत, तर मंत्रिपदाच्या माध्यमातून राम शिंदे यांची साथही भाजपला मिळणार आहे. भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस अंतर्गत असलेले थोरात-विखे गट एकत्रित येऊन सत्ता ताब्यात ठेवतील, अशा अपेक्षा काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांकडून कोणती भूमिका घेतली जाते, याबाबत कार्यकर्तेही ठाम नाहीत. आगामी महिनाभर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी नगरकरांना अनुभवता येणार आहे.

मतदारांची संख्या मर्यादित असल्याने उमेदवारांना अधिक धावपळ करावी लागणार नाही. थेट संपर्कातून मतदार उमेदवारांशी जोडलेले असतात. निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाची शक्यता आहे. ऐनवेळी परस्पर सोयीची भूमिकाही घेतली जाईल.

असे आहेत जिल्हा सहकारी बँकेचे मतदार
संचालकांची२६ वर असणारी संख्या आता २१ पर्यंत खाली आली आहे. निवडणुकीसाठी एकूण ३०७३ मतदार आहेत. विविध कार्यकारी सेवा संस्थांचे १,३०२ मतदार असून प्रत्येक तालुक्यातून एक असे एकूण १४ संचालक ते निवडून देणार आहेत. शेतीपूरक संस्थांचे १,०६७ मतदार असून या गटातून एक संचालक निवडला जातो. बिगरशेती संस्थेचे १३६५ मतदार आहेत. या गटातूनही एकच संचालक निवडण्यात येतो. इतर मागासवर्ग १, अनुसूचित जाती-जमाती १, विमुक्त जाती भटक्या जमाती १, महिला असे संचालक पदे राखीव आहेत.