आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटकांसाठी ‘नगर परिक्रमा’ बससेवा आवश्यक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर परिसरातील पर्यटनस्थळांना भेट देणे सोयीचे व्हावे, यासाठी एसटी महामंडळाच्या सहकार्याने ‘नगर परिक्रमा’ बससेवा सुरू करावी, अशी मागणी सावेडीतील ज्येष्ठ नागरिक मंचाने केली आहे.

नगर शहराच्या 525 व्या स्थापना वर्षाचे औचित्य साधून दैनिक दिव्य मराठीच्या वतीने ‘सिटी वॉक’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत सर्वप्रथम ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याला 3 ऑगस्ट रोजी भेट देण्यात आली. या उपक्रमांत ज्येष्ठ नागरिक मंचाचे सदस्य, अनामप्रेम संस्थेतील अंध विद्यार्थ्यांसह आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘सिटी वॉक’चे सर्वांनी स्वागत करून असे उपक्रम मोठ्या संख्येने नगरमध्ये सुरू व्हायला हवेत. त्याचा फायदा या शहराची वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया मंचाचे अध्यक्ष चंद्रशेखर करवंदे व कार्यवाह अशोक सरनाईक यांनी व्यक्त केली.

भुईकोट किल्ल्याप्रमाणेच नगर शहर व परिसरात अनेक ऐतिहासिक, धार्मिक व सामाजिक महत्त्वाची स्थळे आहेत. तेथे जाण्यासाठी सध्या सार्वजनिक वाहन व्यवस्था उपलब्ध नाही. रिक्षाने जाणे सर्वांना परवडत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी व महापालिकेने यासंदर्भात पुढाकार घेऊन एसटी महामंडळाच्या सहकार्याने दर शनिवारी, रविवारी, तसेच सुटीच्या दिवशी ‘नगर परिक्रमा’ बससेवा सुरू करावी, अशी मागणीही करवंदे व सरनाईक यांनी केली आहे.
मागील ‘सिटी वॉक’मध्ये सहभागी झालेल्या, तसेच पुढच्या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करणा-या अनेकांनीही मुंबई, पुणे, कोल्हापूरच्या धर्तीवर पर्यटकांसाठी स्वतंत्र बस नगरमध्ये सुरू करण्याची मागणी केली. जिल्ह्यात सर्किट टुरिझमलाही मोठा वाव असून अलीकडेच नगरला येऊन गेलेले केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक यांनीही ही योजना सुरू करावी, असे सूचित केले होते.

किल्ल्याबद्दल आपुलकी वाटू लागली...
संरक्षण खात्यात नोकरीला असल्याने अनेकदा किल्ल्यात जाणे व्हायचे. तथापि, किल्ल्याचे आकर्षण कधी वाटले नाही. दिव्य मराठी सिटी वॉक उपक्रमात मात्र किल्ल्याबाहेरील तोफांपासून ते आतील महालांपर्यंत अनेक गोष्टींची अतिशय रोचक माहिती मिळाली. त्यामुळे किल्ल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. कधीकाळी व्यापार, उद्योगात नगर भरभराटीला आले होते. तेव्हा सगळा कारभार या किल्ल्यातूनच पाहिला जात असे. पोर्तुगीज अभियंत्यांच्या मदतीने केलेले किल्ल्याचे भक्कम बांधकाम, निजामशाहीनंतर किल्ल्याचे झालेले बंदिशाळेत रूपांतर अशा अनेक गोष्टी या भेटीत समजल्या. किल्ल्याची दुर्मिळ छायाचित्रे, सुलताना चांदबिबीची चित्रेही पाहता आली. हा किल्ला नगरची अस्मिता आहे. इतर भुईकोट किल्ल्यांसारखे त्यांचे खंडहरमध्ये रूपांतर होऊ नये, यासाठी नगरकरांनीच आवाज उठवला पाहिजे.’’ भालचंद्र बालटे, नगर.