आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसात भिजण्यासाठी पर्यटक महालावर..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहरापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या चांदबीबी महाल (सलाबतखान मकबरा) परिसरात पावसाचा आनंद लुटण्यासाठी नगरसह परराज्यांतील नागरिकांनी रविवारी गर्दी केली होती. सुटीचा दिवस असल्यामुळे पर्यटकांनी सकाळपासून महालावर येत पावसाळी वातावरणाचा मनमुराद आनंद लुटला.

दिवसभर थोड्या-थोड्या अंतराने कोसळणारा पाऊस आणि हिरवागार शालू पांघरलेला महालाचा परिसर पर्यटकांना आकर्षित करत आहे. या महालाचे सौंदर्य पाहण्यासाठी नगर शहरासह परराज्यातील पर्यटक येत आहेत. अनेक कुटुंबांनी रविवारची सुटी महालाच्या परिसरात घालवणे पसंत केले. लहान मुले व तरुणांनी क्रिकेट, फुटबॉल व कबड्डी खेळण्याचा आनंद लुटला. अनेकांनी तेथे वनभोजन घेतले.

दरम्यान, डोके फाउंडेशनने चांदबीबी महाल परिसरातील डोंगरावर एक लाख बीजांचे रोपण करण्याचा विधायक उपक्रम राबवला. त्यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष बलभीम डोके यांनी संशोधित केलेली वनकाठी वापरण्यात आली.

चांदबीबी महाल (सलाबत खान मकबरा) परिसरात पावसाने चांगली हजेरी लावल्याने डोंगरावर हिरवाईचा शालू बहरू लागला आहे. बीजारोपणासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 25 स्वयंसेवकांनी मदत केली. मोहटादेवी देवस्थानचे विश्वस्त अँड. लक्ष्मण वाडेकर, मढी देवस्थानचे विश्वस्त चंद्रकांत गाडे, एम. आर. तांदळे, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या जिल्हा समन्वयक जयश्री कोल्हे या वेळी उपस्थित होत्या.