नगर- बुर्हाणनगर रस्त्यावरील झाडावरचे घर, हौशी वैमानिक सुरेश गुगळे यांचे पॉवर ग्लायडर आणि शेतात त्यांनी तयार केलेले राज्यातील सर्वात मोठे शेततळे, कापूरवाडी गावाजवळील पाचशे वर्षांपूर्वीची पाणी योजना, देवगावच्या डोंगरावरील राडसबा महाल अशा अनेक गोष्टी पाहत व्हर्सटाइल ग्रुपच्या सदस्यांनी रविवार आनंदात साजरा केला.
व्हर्सटाइल ग्रुपच्या वतीने दर महिन्याचा पहिला रविवार नगर परिसरातील पर्यटनस्थळांना भेटींसाठी राखून ठेवण्यात येतो. ही सहल सर्वांसाठी विनामूल्य असते. भुईकोट किल्ल्यापासून सहलीला सुरुवात झाली. पहिली भेट होती बुर्हाणनगरजवळील गुगळे फार्ममधील झाडावरच्या घराला. सुमारे 20-25 वर्षांपूर्वी गुलमोहर आणि कडुनिंबाच्या फांद्यांचा आधार घेऊन बांधलेलं हे ‘ट्री हाऊस’ आणि परिसरातील द्राक्षमळा पाहताना सगळेजण हरखून गेले होते. हे घर बांधणार्या सुरेश गुगळे यांनी राज्यातील सर्वांत मोठे सात अब्ज लिटर क्षमतेचे शेततळे बांधले आहे. उन्हाळ्यात जेव्हा पाण्याची गरज भासते तेव्हा या शेततळ्यातून डाळिंबाच्या 12 हजार झाडांना पाणी दिले जाते. या शेततळ्याजवळच आहे पॉवर ग्लायडरची धावपट्टी. दोनजणांना घेऊन हे विमान आकाशात भ्रमंती करू शकतं. उड्डाणाचे अनेक मजेशीर किस्से गुगळे यांनी ऐकवले.
बुर्हाणनगरची बारव, कापूरवाडीची ‘डिस्ट्रिब्युशन वेल’ पाहताना पूर्वजांच्या योजकतेचे कौतुक वाटले. नंतर मंडळी पोहोचली देवगावचा घाट ओलांडून पवनचक्क्यांच्या प्रदेशात. वीजनिर्मिती करणार्या पवनचक्क्यांचे अजस्त्र पंखे आणि ते फिरताना होणारा आवाज अनेकांनी पहिल्यांदा अनुभवला. याच डोंगरावर निझामशाहीत बांधलेला लहानखुरा चिरेबंदी दगडांचा राडसबा महाल आहे. हा महाल पाहून नंतर सर्वांनी आगडगावच्या श्रीकाळभैरवनाथ मंदिराला भेट देऊन तेथील आमटी-भाकरीचा आस्वाद घेतला.
संदेशवहन आणि टेहळणी..
निझामशाही वास्तूंमध्ये सर्वांत दुर्लक्षित राहिला आहे तो राडसबा महाल. हे नावही गावकर्यांनी दिलेले. मूळ नाव अज्ञातच आहे. दौलताबादकडून येणारे संदेश चांदबीबी महालापर्यंत (सलाबतखान मकबरा) पोहोचवण्याच्या मार्गातील हे एक ठाणे होते. परिसरावर लक्ष ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग होत असे. माथेरानपेक्षा हा परिसर उंच असल्याने वातावरण आल्हाददायक असते. शुद्ध प्राणवायू घेऊन येणारे वार्याचे झोत पर्यटकांच्या चित्तवृत्ती उल्हासित करतात..