आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐतिहासिक ‘मंझरे सुभा’ला प्रतीक्षा पर्यटन विकासाची..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- समुद्रसपाटीपासून सुमारे 2900 फूट उंच डोंगरावर बांधलेला महाल, त्याशेजारी जलविहारासाठी तयार केलेला तलाव, त्यात पाणी भरण्यासाठी हत्ती मोट, स्नानासाठीचा हमामखाना.. हे सगळं पाहायचं असेल, तर मंझरे सुभा अर्थात मांजरसुंभ्याला भेट द्यायला हवी. ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व लाभलेलं हे महत्त्वाचं ठिकाण पर्यटनविकासापासून मात्र अजून वंचित राहिलं आहे.
नगरपासून 20 किलोमीटर अंतरावर वांबोरी घाटाशेजारी मंझरे सुभा आहे. नगरच्या व्हर्सटाइल ग्रुपच्या सदस्यांनी रविवारी तेथे भेट दिली. गोदावरी आणि कृष्णा खोर्‍याच्या सीमारेषेवर डोंगरगण आणि गोरक्षनाथ गडाच्या मध्यभागी असलेल्या डोंगरावर निझामशाहीतील बादशहांच्या विर्शांतीसाठी हा महाल बांधण्यात आला. ‘र्मदानखाना’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या या महालाचे काही अवशेषच आता उरले आहेत. महालाच्या बांधकामासाठी दगड, विटा व चुन्याबरोबर सागवानी तुळयांचा वापर करण्यात आला होता. यातील वीस फुटांपेक्षा लांब तुळया आजही तेथे पाहावयास मिळतात.
महालाच्या समोरील बाजूस तीन कारंजी आहेत. डोंगरावर इतक्या उंचीवर तयार केलेला पोहण्याचा तलाव हे इथले वैशिष्ट्य. हा तलाव व कारंजासाठी डोंगराच्या पोटात टाक्या तयार करून तेथे पावसाचं पाणी साठवलं जातं. हे पाणी उपसण्यासाठी हत्ती मोट होती. उपसलेलं पाणी खापरी नळानं खेळवण्यात आलं होतं. या खापरी नळाचे अवशेष एका ठिकाणी पाहायला मिळतात. गार व गरम पाण्याची सोय असलेला हमामखाना महालाजवळच आहे.
आकाश निरभ्र असेल, तर येथून मुळा व जायकवाडी जलाशयाबरोबर दौलताबादची डोंगररांगही दिसते. रविवारी मात्र ढगांमुळे व्हर्सटाइलच्या सदस्यांची निराशा झाली.
पुरातत्त्व विभागाकडे या महालाची नोंदच नसल्याने त्याची देखभाल केली जात नाही. काही वर्षांपूर्वी नगरच्या एका ग्रुपने महालाची स्वच्छता करून तेथे माहिती फलक लावला होता. तोही आता गायब झाला आहे.
संशोधनाची गरज
पायथ्याशी बुरूजांबरोबर काही वास्तूही होत्या. आता घरांची जोतीच उरली आहेत. तेथे उत्खनन व संशोधन झाल्यास निझामशाहीच्या इतिहासातील अप्रकाशित भागावर प्रकाश पडू शकेल. या डोंगरावर पूर्वी उद्यान होते. डोंगराच्या पोटातील टाक्यांमधील पाण्याचा उपयोग करून तेथे पुन्हा हिरवाई तयार करता येईल. डोंगरावरील दिवे आणि रस्त्याचे कामही वेगाने होण्याची गरज आहे.