आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरमध्ये ‘शॉर्टकट’चा जीवघेणा खेळ !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- वाहतूक कोंडीतून सुटका, वेळेत पोहोचण्याची घाई, तसेच किरकोळ इंधन बचतीसाठी अनेकजण शॉर्टकटचा आधार घेत आहेत. शहरातून जाणार्‍या नगर-औरंगाबाद व नगर-मनमाड महामार्गावरील विविध चौकांमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. जिल्हा रुग्णालय, महेश थिएटर, कोर्ट परिसर, आरटीओ कार्यालय, कोठला आदी ठिकाणी तर वाहतुकीचे नियम तोडण्यासाठी वाहनचालकांमध्ये दिवसभर स्पर्धा सुरू असते. ‘टीम दिव्य मराठी’ने बुधवारी सकाळी शॉर्टकट मार्गांसह विविध चौकांतील वाहतुकीची पाहणी केली. यावेळी प्रत्येक वाहनचालकाला लवकर जाण्याची घाई असल्याचे दिसून आले. या घाईत अनेकांकडून वाहतुकीचे नियम पायदळी तुडवले जात होते.

सज्रेपुर्‍याकडून येणारी वाहने महेश थिएटरजवळ सरळ नगर-औरंगाबाद मार्गावर येतात. या ठिकाणी महामार्ग ओलांडण्यासाठी सर्वांची घाई सुरू होती. तेथे वाहतूक पोलिसही नव्हता. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक मोठय़ा प्रमाणात विस्कळीत झाली होती.

कोठला परिसरातही अशीच परिस्थिती होती. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी वाहने स्टेट बँक चौकातून न जाता अशोक हॉटेलजवळील शॉर्टकटने जात होती. तेथे दिवसभर शॉर्टकटचा जीवघेणा खेळ सुरू होता.

जिल्हा परिषद कार्यालयासमोरील रस्त्यावर दुभाजक बसवण्यात आले असले, तरी अनेकजण वाहतुकीचे नियम तोडून ‘नो एंन्ट्री’तून जिल्हा परिषद कार्यालयात जात होते.

तारकपूर रस्त्याला लागून असलेल्या जिल्हा रुग्णालय परिसरातही शॉर्टकट मार्गाचा पुरेपूर वापर सुरू होता. रुग्णालयाची संरक्षक भिंत गेल्या काही वर्षांपासून शॉर्टकटसाठी फोडण्यात आली आहे. अप्पू हत्ती चौकातून जाणारे व तारकपूर परिसरातून येणारे वाहनचालक सर्रास या मार्गाचा वापर करताना दिसून आले. केवळ पत्रकार चौकातील सिग्नलचा अडथळा व थोडेसे अंतर वाचवण्यासाठी हा प्रकार सुरू आहे. रुग्णालय परिसरातून जाणार्‍या शॉर्टकट मार्गावरून अचानक समोर येणारे वाहन न दिसल्याने तारकपूर रस्ता व जिल्हा रुग्णालयासमोरील वाहतूक मोठय़ा प्रमाणात विस्कळीत झाली होती.

शहरात सर्वत्र अशीच परिस्थिती आहे. केवळ शॉर्टकटच्या अट्टहासामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ आले आहेत. कोणत्याही रस्त्यावर व चौकात रोज हजारो वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे कारवाई तरी कोणावर आणि कशी करणार, असा प्रश्न वाहतूक पोलिसांना पडला आहे.

मनपाची उदासीनता
प्रत्येक चौकात सिग्नल बसवले, तर वाहतूक व्यवस्थेत काही प्रमाणात सुधारणा होईल. मात्र, त्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. सध्या केवळ चार चौकांमध्ये सिग्नल सुरू आहेत. उर्वरित चौकांत सिग्नल बसवण्यासाठी महापालिकेने 35 लाखांची स्वतंत्र तरतूद केली आहे. खासगी तत्त्वावर सिग्नलचे काम देण्यासाठी प्रशासनाने आतापर्यंत अनेकदा निविदा प्रसिध्द केली. परंतु मनपाकडून पैसे मिळतील याची खात्री नसल्याने एकही ठेकेदार सिग्नलचे काम करण्यास तयार नाही. त्यामुळे प्रत्येक चौकात सिग्नल बसवण्याचा मनपाचा मनसुबा गेल्या दोन वर्षांपासून धूळखात पडला आहे.

खंदक खोदणार
रुग्णालय परिसरात केवळ वाहनेच नाही, तर जनावरांचाही मोठा त्रास आहे. तारकपूर रस्त्याच्या कडेला संरक्षक भिंत पाडून तेथे शॉर्टकट तयार करण्यात आला आहे. यापूर्वी अनेकदा हा मार्ग बंद करण्यात आला होता. परंतु भिंत पुन्हा पाडण्यात आली. रस्ता रुंदीकरणासाठी भिंत मागे घेण्यात येणार आहे. त्यापूर्वी ही बेकायदेशीर वाहतूक थांबवण्यासाठी शॉर्टकट मार्गाच्या दोन्ही ठिकाणी लवकरच खंदक खोदण्यात येणार आहे. रुग्णालय परिसरात देवीचे मंदिर आहे. या मंदिरापर्यंतच वाहन येऊ शकेल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.
-डॉ. रवींद्र निटूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक