आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनावरांचा ‘ट्रॅफिक जाम’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिकेने कोंडवाडा विभागाकडे दुर्लक्ष केल्याने शहरातील मोकाट जनावरांची संख्या दीड हजारांहून अधिक झाली आहे. कोंडवाड्यासाठी दरवर्षी करण्यात येणारी पाच लाखांची तरतूद कागदोपत्रीच आहे. या विभागाचे खासगीकरण व वाढीव कर्मचार्‍यांचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून धूळखात पडून आहे. मोकाट जनावरांनी आता रस्त्यांचा ताबा घेतला असून त्याचा त्रास नागरिकांना होत आहे.

कोंडवाडा विभागाच्या म्हणण्यानुसार सध्या शहरात दीड हजारांहून अधिक मोकाट जनावरे आहेत. मात्र, त्यांना पकडण्यासाठी पुरेसे कर्मचारी व आवश्यक साधनसामग्री नसल्याने या विभागाच्या कर्मचार्‍यांची दमछाक होते. या विभागात केवळ पाच कर्मचारी असून त्यापैकी दोन निवृत्तीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे जनावरे कशी पकडायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लहान-मोठे रस्ते, मोकळी मैदाने, चौक अशा सर्व ठिकाणी मोकाट जनावरांनी ठाण मांडले आहे. काही जनावरे चक्क उद्यानांमध्ये फिरताना दिसतात. माळीवाडा वेस, अमरधाम, दिल्लीगेट, सज्रेपुरा, रेल्वेस्टेशन, सावेडी व मुकुंदनगर परिसरात मोकाट जनावरांची संख्या जास्त आहे. ही जनावरे भर रस्त्यात उभी राहात असल्याने वाहनचालक व पादचार्‍यांना जीव मुठीत धरून जावे लागते. काही वाहनचालकांना अपघातालाही सामोरे जावे लागले आहे.

मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात ठेवण्याची जबाबदारी मनपाची आहे. परंतु मागील दोन वर्षांपासून मनपाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. प्रत्येक वेळी जनावरांकडे दुर्लक्ष करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सावेडीतील हुंडेकरी लॉनच्या पाठीमागे मनपाचा कोंडवाडा आहे. त्याची दुरवस्था झाली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेला कोंडवाड्याच्या संरक्षक भिंतीचा प्रश्न मागील वर्षी मार्गी लागला, तरी शहरातील मोकाट जनावरांची स्थिती ‘जैसे थे’ आहे. काही दिवसांपूर्वीच एका वळूने शहरात धुमाकूळ घालून चार-पाचजणांना जखमी केले. वळूला पकडताना कोंडवाडा व अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यांच्या नाकीनऊ आले होते.