आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवजड वाहतुकीमुळे कोंडला रस्त्यांचा श्वास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहरातून जाणार्‍या अवजड वाहनांमुळे महामार्गांवर सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी होत आहे. कोठी रस्त्यावर बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर, तसेच महात्मा फुले चौकात तासन्तास वाहतूक ठप्प होत आहे. कोठला स्टँड परिसर व आरटीओ कार्यालयासमोरही वाहतूक कोंडी होते. आरटीओ व पोलिस प्रशासनाला मात्र त्याचे गांभीर्य नाही.

सकाळी नऊ ते दुपारी बारापर्यंत अवजड वाहतुकीला शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. परंतु अवजड वाहने त्यापूर्वीच शहरात प्रवेश करतात. बर्‍याचदा कोठला स्टँड, चांदणी चौक, कोठी रस्ता, मनमाड रस्ता आदी परिसरात ही अवजड वाहने दिवसभर रस्त्याच्या कडेला उभी राहतात. त्यामुळे महामार्गांवर दिवसभर वाहतुकीची कोंडी होते. अनेकदा समोरचे वाहन अचानक थांबल्यामुळे किरकोळ अपघातही होतात. नगर-औरंगाबाद व नगर-मनमाड महामार्गावर हेच चित्र दिसते. वाहतुकीच्या कोंडीमुळे किरकोळ अपघातही होतात.

औरंगाबाद, तसेच मनमाड महामार्गावरून अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने अनेकदा रस्त्यातच उभी राहतात. या वाहनांतील प्रवासी खाली उतरेपर्यंत पाठीमागे वाहनांची रांग लागते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. हॉटेल नटराज ते हॉटेल सिंग रेसिडेन्सी हा रस्ता आरटीओ कार्यालयासमोरून जातो. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिवसभर अवजड वाहने उभी असतात. त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यावरून एकेरी वाहतूक चालते. वाहतुकीच्या कोंडीमुळे या रस्त्यावरही अपघात होतात.

कोठी रस्त्यावर जड वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी होते. छोटी वाहने नियम धुडकावून उलट दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. समोरासमोर वाहने आली की वाहतूक ठप्प होते. पाटील हॉस्पिटलजवळ चौकामध्ये दोन वाहतूक पोलिस वाहतुकीचे नियमन करत असतात. परंतु कोठी रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तिकडे जाण्याची तसदी कोणी घेत नाही.