आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीनंतर महामार्गांवर वाहतूक कोंडी, खासगी बसथांब्यांवर तोबा गर्दी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- दिवाळीचासण साजरा केल्यानंतर नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी परत निघालेल्या नागरिकांमुळे नगर शहरातील तिन्ही बसस्थानकांवर गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड गर्दी झाली. प्रवाशांच्या तुलनेत बसगाड्यांची संख्या अपुरी पडल्यामुळे बसची वाट पहात तासन्तास ताटकळत थांबण्याची वेळ आली. बसमध्ये स्थानकावर झालेल्या गर्दीमुळे मनस्ताप करतच नोकरी, व्यवसायाचे गाव गाठावे लागत आहे. तारकपूर आगाराने अतिरिक्त गाड्या मागवूनही गर्दीचा ताण कमी झालेला नाही. खासगी वाहनांमुळे शहरातून जाणारे महामार्गही ठप्प होत अाहेत.

शहर जिल्ह्यातून नोकरी, व्यवसायानिमित्त मोठ्या शहरांत गेलेले नागरिक दिवाळीसाठी आपल्या गावी आले होते. शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) भाऊबीजेने दिवाळी सणाची सांगता झाली. त्यानंतर नोकरी, व्यवसायाच्या गावी जाण्यासाठी शुक्रवारी सायंकाळपासूनच नागरिकांनी बसस्थानकांवर मोठी गर्दी केली होती. तुलनेत बसची संख्या कमी होती. प्रवाशांची गर्दी इतरी वाढली की, बसस्थानकावर उभे राहण्यासाठीही जागा मिळत नव्हती. असेच चित्र खासगी बसथांब्यावरही दिसत होते. खासगी बसचे आरक्षण मिळणेही मुश्किल झाले होते.

अन्य ठिकाणांहून शहरात येणाऱ्या लांब पल्ल्याच्या बस प्रवाशांनी भरूनच यायच्या. दहा-बारा प्रवासीयेथील बसस्थानकात उतरायचे. मात्र, जाणाऱ्यांची संख्या जास्त होती. त्यामुळे बसमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवाशांना अक्षरशः धावपळ करावी लागत होती लांब पल्ल्याच्या अनेक बसमधील आसने काही प्रवाशांनी आरक्षित केली होती. त्यांना जागा मिळण्याची खात्री असली, तरी बसमध्ये चढताना मोठी यातायात करावी लागत होती. ज्येष्ठ नागरिक, महिला चिमुकल्यांना तर धक्काबुक्की सहन करतच बसमध्ये चढावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ झाली.

अनेक प्रवाशांना पुणे, औरंगाबाद, मुंबईकडे जाणाऱ्या बसमध्ये उभं राहूनच प्रवास करण्याची वेळ आली. शहरी भागाकडे जाणाऱ्या प्रवाशांचे एकीकडे असे हाल सुरू असताना ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांनाही असाच अनुभव घ्यावा लागत होता. ग्रामीण भागासाठी ठरावीक वेळेतच बससेवा उपलब्ध आहे. बस आली की मेंढराप्रमाणे प्रवासी भरून ती निघायची. जागा मिळवण्यासाठी, प्रवाशांची झुंबड उडत होती.

वाहतूक पोलिसांची अकार्यक्षमता, अतिक्रमणे बंद सिग्नलमुळे नगर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे.

वाहतूक पोलिस शाखेत अपुरे मनुष्यबळ
शहरवाहतूक शाखेत मनुष्यबळ कमी आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे वाहतूक शाखेत नवे अधिकारी आले आहेत. चौकांमध्ये चोवीस तास पोलिस नेमणे अशक्यप्राय आहे. त्याची परिणती चौकांमध्येही वाहतूक कोंडी होण्यात होत आहे. शिवाय शहरानजीकच्या महामार्गांवरही सतत वाहतूक कोंडी होत आहे. सोमवारी दुपारनंतर तर सोलापूर रस्त्यावर वाहतूक ठप्पच झाली होती. पोलिसांचाही याला नाईलाज होता. त्यामुळे छोटी-मोठी वाहने मिळेल त्या जागेतून पुढे सरकत होती.

बाह्यवळण रस्तेही फुल्ल
शहरातीलवाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून बाह्यवळण रस्ते काढण्यात आले. केडगाव ते निंबळक शेंडी ते एमआयडीसी असे दोनच बाह्यवळण रस्ते सध्या बऱ्या अवस्थेत आहेत. या बाह्यवळण रस्त्यांवरही सध्या दिवाळीनंतरची परतीची वाहने ये-जा करत आहेत. त्यामुळे बाह्यवळण रस्ते गजबजले आहेत. एकामागे एक वाहन सुरुच असल्यामुळे ओव्हरटेक करणेही धोक्याचे झाले आहे. केडगाव ते निंबळक बाह्यवळण रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्यामुुळे किरकोळ अपघात होत आहेत. त्याचा परिणामही वाहतूक कोंडी होण्यावर झाला आहे.

अवजड वाहतूक शहरातून
खासगीवाहनांमुळे रस्ते गजबजले आहेत. यात भर म्हणून अवजड वाहतूक शहरातूनच जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून अवजड वाहतुकीला शहरात कायमची बंदी घातली आहे. तथापि, या आदेशाचे सर्रास उल्लंघन करत शहरातील अंतर्गत रस्त्यांवरुन अवजड वाहने भरधाव वेगाने धावत आहेत. डीएसपी चौकातून अवजड वाहने मनमाड महामार्गावरुन मार्गक्रमण करत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर दिवसभर वाहतूक कोंडी होत आहे. या वाहनांवर कारवाई करण्यासही पोलिसांना वेळ नाही.

पर्यटनस्थळे गजबजली
दिवाळी,पाडवा, भाऊबीज या सणांनंतर लागून आलेल्या शनिवार, रविवारच्या सुटीमुळे विविध पर्यटनस्थळे पाहण्यासाठी गर्दी वाढली होती. शिर्डी शनिशिंगणापुरातही तर अलोट गर्दी होती. सुटीमुळे शहरातील पर्यटकही या स्थळांना भेटी देण्यासाठी जात असल्याने सर्व ठिकाणी तोबा गर्दी झाली हाेती. सलग सुट्यांमुळे बाहेरील पर्यटकांनी शहरातील हॉटेल्स खासगी ठिकाणचे हॉल, खासगी फ्लॅटही मोठ्या प्रमाणात आरक्षित केले होते. शनिवारी, रविवारी आलेल्या पर्यटकांना राहण्यासाठी जागेची शोधाशोध करावी लागत होती.

चोरट्यांची दिवाळी
माहेरीनिघालेल्या एका महिलेला माळीवाडा बसस्थानकात चोरट्याने इंगा दाखवला. मुलासह बसमध्ये चढत असताना या महिलेच्या पर्समधून चोरट्याने १० हजार रुपयांची रोकड १२ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले. शिल्पा सिद्धार्थ गायकवाड (२५, हवेली, पुणे) या माजलगावला जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना हा प्रकार घडला. त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवला असून हेड कॉन्स्टेबल चौगुले तपास करत आहेत.

अवैध वाहतूकही तेजीत
एसटीआणि खासगी बसची सेवा तोकडी पडल्यामुळे अवैध प्रवासी वाहतुकीला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. काही व्यावसायिक आणि एजंटांनी बसस्थानक आणि रेल्वेस्थानकातूनच प्रवाशांना पळवण्याचे काम केले. मिनी बस, ट्रॅव्हल्स यासह इतर खासगी गाड्यांकडे प्रवाशांना आकर्षित केले जात होते. प्रवाशांची संख्या लक्षणीय असल्याने चढ्या दराने, जवळपास दुप्पट भाडे आकारून प्रवाशांचे दिवाळे काढण्यात आले. त्यामुळे प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत होते.