आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Traffic Poce And Mla Sangram Jagtap Clashesh In Nagar

बुलेटस्वारांवरील कारवाई प्रकरण, आमदारांची वाहतूक पोलिसांशी खडाजंगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहर वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे संतापलेले अामदार संग्राम जगताप वाहतूक पोलिसांची चांगलीच खडाजंगी उडाली. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी शहर वाहतूक शाखेसमोर झाला. यावेळी कार्यकर्त्यांची गर्दी झाल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. अतिरिक्त पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी जगताप यांचे म्हणणे ऐकून घेऊन जप्त केलेल्या वाहनाची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. मात्र, जप्त केलेल्या वाहनाची कागदपत्रे नसल्यामुळे आमदारांनी काढता पाय घेतला. नंतर तणाव निवळला.

दोन दिवसांपूर्वी मार्केटयार्ड चौकात बुलेटवर कारवाई सुरु होती. एका बुलेटस्वाराने अरेरावी केल्यामुळे पोलिसांनी संबंधीत बुलेट जप्त करुन वाहतूक शाखेत आणली. दोन दिवस उलटूनही बुलेटस्वार वाहतूक शाखेत फिरकला नाही. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी पोलिस अधीक्षक चौकात शहर वाहतूक शाखेची कारवाई सुरु होती. यावेळी पुन्हा एका बुलेटस्वाराने सहायक निरीक्षक भोळे यांच्याशी हुज्जत घातली. त्यामुळे पोलिसांनी त्याचे वाहन जप्त करुन वाहतूक शाखेत आणून लावले. ही बाब समजताच आमदार जगताप कार्यकर्त्यांसमवेत शहर वाहतूक शाखेत अाले. तेथे त्यांची पोलिसांशी खडाजंगी झाली.

यावेळी गर्दी जमल्यामुळे तणावसदृश परिस्थिती िनर्माण झाली. ही बाब समजताच अतिरिक्त पाेलिस अधीक्षक देशमुख वाहतूक शाखेत आले. कोतवाली तोफखाना ठाण्याचे पाेलिस निरीक्षकही आले. ज्याची बुलेट जप्त झाली, त्या युवकानेही भोळे यांच्यावर संताप व्यक्त केला. अतिरिक्त अधीक्षक देशमुख यांनी आमदार जगताप यांच्याशी चर्चा केली. जगताप यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवले. विद्यार्थ्यांना नाहक त्रास दिला जातो, वाहतूक पोलिस अरेरावी करतात असे आरोप त्यांनी केले. मात्र, ज्या बुलेटवर कारवाया केल्या, त्यांच्या नंबरप्लेट फॅन्सी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणारच, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. वाहनाची कागदपत्रे नसल्यामुळे अामदार जगताप तेथून निघून गेले.