आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुकानदाराने घेतला वाहतूक जनजागृतीचा वसा, राज्यभर मोटारसायकल दौरा करून राबवणार अभियान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी येथील कापड व्यावसायिक बापूराव गुंड यांनी वाहतूक नियमांच्या जनजागृतीचा वसा घेतला आहे. नागरिकांना वाहतूक नियमांचे महत्त्व कळावे, यासाठी त्यांचा राज्यभर मोटारसायकल दौरा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी नगरमध्ये त्यांनी कापडबाजार, नगर व न्यू आर्ट्स महाविद्यालय परिसरात वाहतूक नियमांसाठी जनजागृती केली. युवकांनी या अनोख्या अभियानास उत्स्फूर्त दाद देत बापूरावांच्या कार्याचे कौतुक केले.अंगावरील शर्टवर ठळकपणे लिहिलेले वाहतूक नियम, हातात पत्रकांची पिशवी, डोक्यावर गांधी टोपी यामुळे बापूराव समोरच्यांचे लक्ष वेधून घेतात. फुरसुंगी येथे कपड्यांचा व्यवसाय करणारे बापूराव पदवीधर आहेत. मागील पंधरा वर्षांपासून त्यांना नागरिक व देशाच्या हितासाठी कार्य करण्याची आवड निर्माण झाली. अपघाताला सामोरे गेलेले अनेक कुटुंबे त्यांच्या निदर्शनास आली. त्यांचे दु:ख पाहून बापूराव यांनी वाहतूक नियमांची जनजागृती करण्याचा विडा उचलला. पुणे शहरापासून बापूराव यांनी या अभियानास सुरुवात केली. सार्वजनिक ठिकाणे, महाविद्यालये, बाजारपेठा, बँका अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊन ते वाहतूक नियमांची पत्रके वाटतात. नागरिकांना नियमांचे पालन करण्याची विनंती करतात. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. बापूराव यांनी नगर शहरातील कापडबाजार, बसस्थानक, महाविद्यालये आदी ठिकाणी जाऊन वाहतूक नियमांविषयी जनजागृती केली. त्यांचे हे कार्य पाहून शहरातील युवक वर्ग प्रोत्साहित झाला. यापुढे वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची प्रतिज्ञा अनेकांनी घेतली.
वाहतुकीचे नियम
वेगमर्यादा पाळा, वेळेत निघा, वेळेत पोहोचा, गाडी चालवताना मोबाइलवर बोलू नका, सिग्नल तोडू नका, पोिलसांना सहकार्य करा, अल्पवयीन मुलांना गाडी चालवण्यास देऊ नका, स्वत:सह इतरांच्या जिवाची काळजी घ्या, ओव्हरटेक टाळा, हेल्मेट वापरा हे नियम पाळण्याचे आवाहन बापूराव यांनी नगरकरांना केले.