आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा संकलन अडले "स्थायी'च्या मंजुरीसाठी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सावेडीउपनगरातील घनकचरा संकलन वाहतूक खासगीकरणाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक ठेकेदार संस्थेकडून आलेली निविदा महापालिका प्रशासनाने निश्चित करून तसा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठवला. परंतु हा प्रस्ताव गेल्या दोन महिन्यांपासून मंजुरीविना रखडला आहे. स्थायी समितीचे सभापती गणेश भोसले खूनप्रकरणात अडकल्याने स्थायीची सभा लांबणीवर पडली. परिणामी खासगीकरणातून होणारे घनकचरा संकलनही रखडले आहे.

शहरातील घनकचरा संकलनाचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनाने खासगीकरणाचा उपाय शोधला. सावेडी उपनगरात खासगीकरणाच्या माध्यमातून कचरा उचलण्यासाठी मनपाने निविदा मागवल्या होत्या. स्थानिक ठेकेदार संस्थेने त्यासाठी निविदा सादर केली आहे. ठेकेदार संस्थेने सादर केलेल्या निविदा दरात कपात करून प्रशासनाने ती कोटी २३ लाख रुपयांपर्यंत निश्चित केली. मात्र, स्थायीच्या मंजुरीविना ही निविदा प्रक्रिया रखडल्याने घनकचरा संकलनाचा मार्ग सध्या बंद झाला आहे. स्थायीचे सभापती गणेश भोसले एका खूनप्रकरणात अडकले आहेत. अटकपूर्व जामीन मिळल्याने ते सध्या फरार आहेत. सभापतीच अज्ञातवासात गेल्याने स्थायीची सभा बोलावणार तरी कोण, असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

शहरात दररोज तब्बल १४० टन कचरा निर्माण होतो. त्यापैकी केवळ ७० ते ८० टन कचराच उचलला जातो. उर्वरित कचरा तसाच पडून राहतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी मनपा प्रशासनाने खासगीकरणाचा मार्ग शोधला. परंतु स्थायीची सभा होत नसल्यामुळे खासगीकरणाच्या माध्यमातून होणारे घनकचरा संकलन रखडले आहे.

ज्येष्ठांना अधिकार
स्थायीचेसभापती सध्या अज्ञातवासात असले, तरी त्यांच्या गैरहजेरीत एखादा ज्येष्ठ सदस्य स्थायीची सभा बोलवू शकतो. सभापतींमुळे कचरा संकलनासह अनेक विषय मंजुरीविना प्रलंिबत आहेत. सभापती भोसले यांच्यामागे आणखी काही दिवस खूनप्रकरणाचा ससेमिरा सुरू राहणार आहे. त्यामुळे एखाद्या ज्येष्ठ सदस्याने स्थायीची सभा बोलवून प्रलंिबत विषयांना मंजुरी द्यावी, अशी मागणी नगरसेवकांसह नागरिक करत आहेत.

सव्वा कोटी खर्च
सावेडीउपनगरातील कचरा संकलन वाहतुकीसाठी सध्या दरवर्षी सव्वा कोटीपेक्षा अधिक खर्च होतो, तरी देखील नागरिकांच्या घरापर्यंत दररोज घंटागाडी जात नाही. परिणामी कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. रस्ते, मोकळे भूखंड, ओढे-नाले, तसेच मैदानांवर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सावेडी उपनगरात सध्या मनपाच्या १६ वाहनांद्वारे कचरा संकलन करण्यात येते. मात्र, खासगीकरणानंतर ही वाहने मनुष्यबळ शहराच्या इतर भागासाठी वापरण्यात येणार आहे.

२४ तास घंटागाडी
सावेडीउपनगरात खासगीकरणातून कचरा संकलन करण्यासाठी संबंधित ठेकेदार संस्थेशी पाच वर्षांचा करार करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभागात दररोज घंटागाडी उपलब्ध होईल, याची जबाबदारी ठेकेदार संस्थेवर राहील. त्यासाठी अावश्यक असलेली वाहने, मनुष्यबळ संबंधित संस्थेकडेच असेल. सावेडीतील दहा प्रभागांत ही सेवा चोवीस तास उपलब्ध होणार आहे. त्यानंतर सावेडी उपनगरातील कचरा संकलन वाहतुकीचा प्रश्न कायमचा सुटेल, परंतु स्थायीच्या सभेविना कचरा संकलनाची निविदा प्रक्रिया रखडली आहे.

निविदेची मंजुरी गरजेची
सावेडीत खासगीकरणातून घनकचरा संकलन होणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, स्थायीची मंजुरी नसल्याने हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. कचरा पडून असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे निविदेस तातडीने मंजुरी देणे गरजेचे आहे. तसे झाल्यास कचऱ्याचा प्रश्न सुटेल. प्रशासनाने याबाबत कार्यवाही करणे गरजेचे आहे.'' रुपालीवारे, नगरसेविका.