आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदल्यांमुळे तापले झेडपीचे राजकारण, काँग्रेस राष्ट्रवादीतील धुसफूस चव्हाट्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शिक्षण विभागात बदल्यांचा सपाटा सुरू असल्याचा आरोप करून सत्ताधारी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला. शिक्षण समितीचे सभापतिपद हे काँग्रेसचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्याकडे आहे. त्यामुळे या विषयाला वेगळेच वळण लागण्याची चिन्हे आहेत. दोन्ही काँग्रेसच्या आघाडीची सत्ता असताना विविध कामांतून विसंवाद समोर येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्यावेळी तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने भाजप शिवसेनेशी फारकत घेऊन काँग्रेसशी हातमिळवणी केली. या सहमतीमुळे अडीच वर्षे विरोधी बाकावर बसलेला काँग्रेस पक्ष सत्तेत आला. तडजोडीत अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, तर उपाध्यक्षपद काँग्रेसकडे गेले. त्यामुळे दोन्ही काँग्रेसकडून पारदर्शी पद्धतीने एकमेकांना विश्वासात घेऊन जिल्ह्याचा कारभार करण्याच्या वल्गनाही करण्यात आल्या. पण त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. राष्ट्रवादीचे गटनेते शरद नवले हे देखील अस्वस्थ असल्याचे त्यांच्याच कार्यकर्त्यांनी खासगीत सांगितले. पण ही अस्वस्थता का, याबाबत नवले मौन पाळून आहेत.

नुकतीच नवीन ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतींची यादी समोर आली. त्यात अध्यक्ष मंजूषा गुंड यांच्या कर्जत तालुक्यात सर्वाधिक इमारती मंजूर आहेत. काँग्रेसच्या नेत्यांच्या तालुक्यातील मंजूर ग्रामपंचायत कार्यालयांचा आकडा तुलनेने कमी आहे. काँग्रेस राष्ट्रवादीमधील अंतर्गत धुसफूस त्यामुळे चांगलीच जोर धरू लागली आहे. पण ही धुसफूस प्रसारमाध्यमांना कळू नये, यासाठी समन्वयातूनच काम करतो असा संदेश देण्याचा प्रयत्न आहे. परंतु दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे जि. प. सदस्य झावरे यांनी थेट शिक्षण विभागातील बेकायदेशीर बदल्यांवरच बोट ठेवल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. झावरे यांनी शिक्षण विभागात बेकायदेशीर बदल्यांचा सपाटा सुरू आहे, त्याचे पुरावेही आपल्याकडे असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती शेलार यांच्यासह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या संपूर्ण प्रकारामुळे शेलार अस्वस्थ आहेत.

या प्रकारामुळे काँग्रेस राष्ट्रवादीमधील धुसफूस चव्हाट्यावरच आली आहे. बदल्यांबाबत कोणताही वाद होऊ नये, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्याकडूनही प्रयत्न सुरू आहेत. झावरे आंदोलन मागे घेतील, पण बदली प्रकरणाची चौकशी केल्यानंतरच अशी चर्चा आता रंगली आहे.

पुरावे द्या... संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करू
कोणतीही बदली बेकायदेशीर झालेली नाही. पण आरोप होत असेल, तर पुरावा सादर करा. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल. काँग्रेसला टार्गेट करू नये. नियोजनमधून झेडपीच्या निधीला कात्री लागली. तो मिळवण्यासाठी संबंधितांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करावे. अण्णासाहेब शेलार, उपाध्यक्ष,(काँग्रेस).

हा पक्षीय विषय नाही...
शिक्षण विभागातीलब दल्यांबाबत मी जो आरोप केला, तो ठोस सबळ पुराव्यांच्या आधारावर केला. मी मांडलेला विषय प्रशासकीय आहे, तो कोणत्या पक्षाविषयी नाही. यासंदर्भात मी उपाध्यक्ष शेलार यांच्याशी चर्चा केलेली नाही. पण ते म्हणत असतील तर देतो, पुरावे त्यांनीही कारवाई काय करणार हे स्पष्ट करावे. सुजित झावरे, सदस्य,जिल्हा परिषद.