आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tribal Youth Beating News In Marathi, Divya Marathi, Liquor

दारू चोरल्याच्या संशयावरून आदिवासी तरुणाला वडझिरे येथे बेदम मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर - प्रेमप्रकरणातून खर्डा येथे झालेल्या दलित युवकाच्या हत्येच्या प्रकरणामुळे राज्यभर खळबळ माजली असतानाच पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे हातभट्टीची दारू चोरल्याच्या संशयावरून एका आदिवासी तरुणास बेदम मारहाण झाली. ही घटना शनिवारी (3 मे) रात्री घडली. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ ठाकरवाडी येथील आदिवासी महिलांनी रविवारी सकाळी वडझिरे येथे जाऊन हातभट्टी विकणारी पाचही दुकाने फोडून टाकली़ मारहाण करणा-या भीमाजी लंके याला पोलिसांनी अटक केली आहे.

शनिवारी रात्री आठच्या सुमारास हातभट्टी चालवणारा भीमाजी रामचंद्र लंके ठाकरवाडी येथे विजय नामदेव केदारी याच्या घरी आला. त्या वेळी विजय व त्याची पत्नी शेवंता हे दोघेच घरी होते. आपल्याला बाहेर जायचे आहे, असे सांगून भीमाजीने विजयला घराबाहेरील मैदानात बोलावले़ विजय येताच ‘माझी दारू का चोरली?’ अशी विचारणा करून भीमाजीने त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत विजय जखमी झाला. तेथील तरुणांनी रात्री विजय यास वडझि-यातील खासगी रुग्णालयात दाखल केले.

या घटनेच्या निषेधार्थ रविवारी सकाळी ठाकरवाडीतील महिलांनी वडझिरे येथे जाऊन पाचही हातभट्टीची दुकाने उद्ध्वस्त केली. बेकायदेशीरपणे सुरू असलेली ही दारूविक्री पोलिसांना का दिसत नाही, याच दुकानांमुळे आमच्या संसारांची वाताहत होत आहे, असा आरोप महिलांनी केला. लीला केदारे, राधाबाई कडाळे, सगुणा केदारे, भुसाबाई वामन केदारे, शेवंताबाई केदारे यांच्या नेतृत्वाखालील महिलांनी पोलिस ठाण्यात येऊन आरोपींना अटक करा, गावातील बेकायदेशीर दारू दुकाने बंद करा अशी मागणी करत ठिय्या दिला. महिलांचा संताप पाहून विजय केदारी यांच्या पत्नीची फिर्याद नोंदवून घेत पोलिसांनी आरोपीला अटक केली. नितीन कडाळे, दादू केदारे, सुनील केदारे, विकास केदारे हे आदिवासी विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.