आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आला क्षण, गेला क्षण, उरी राहिले स्मृती क्षण...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मराठीतील नामवंत ज्येष्ठ कवी समीक्षक प्रा. शंकर विनायक वैद्य यांचे मागील वर्षी २३ सप्टेंबरला निधन झाले. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांची पुतणी वसुंधरा वैद्य-कुलकर्णी (नगर) यांनी आपल्या काकांच्या आठवणींना उजाळा दिला.वसुंधरा म्हणाल्या, शंकरकाका मुंबईत माटुंग्याला अफ्रिका हाऊसमध्ये रहायचे, तर आमचं कुटुंब महाराष्ट्राबाहेर दिल्लीत. आम्हा चौघा बहिणींचं मराठी कसं अस्खलित राहील, शुद्ध राहील याची काकांना काळजी. काका पत्रांतून आम्हाला शुद्धलेखनाचे धडे द्यायचे. अक्षर सुंदर, वळणदार कसं काढावं? का काढावं? याबद्दल सांगायचे...

बुद्धिबळ आम्ही त्यांच्याकडूनच शिकलो. शिकलो म्हणण्यापेक्षा "जगलो' शब्द योग्य ठरेल. अफ्रिका हाऊसच्या एका बाजूला मोठं हॉस्पिटल होतं. घर आणि हॉस्पिटलमध्ये भली मोठी मोकळी जागा, अगदी फरशा घातलेली. मूड आला की काका आम्हां सगळ्यांना तिथे घेऊन जायचे. त्या फरश्यांचे बनायचे चेसबोर्डवरचे चौकोन आणि आम्हा सर्वांना मिळायचा एक-एक रोल. सगळ्यात मोठी रोहिणीदीदी असायची राजा. मी सगळ्यात छोटी म्हणून प्यादं. बाकी मधले सगळे पांढरे-काळे हत्ती, घोडे, उंट. तुझी चाल सरळ, तुझी तिरकी. तुझी अडीचं घरं, तू एकच घर... असं सांगून ते आम्हाला आट्या-पाट्या खेळाव्यात तसा चेस शिकवायचे.

खट्याळ नजरेच्या मिश्कील गालातल्या गालात हसून कोट्या करणाऱ्या, गोऱ्यापान, निळ्या डोळ्यांच्या लाडक्या दीराला माझी आई कधीतरी चिडवायची, 'भाऊजी, सरोज तुमच्यापेक्षा जरा सावळीच आहे नाही का?' काकांचे शब्द अलवार व्हायचे. म्हणायचे, 'विद्यावहिनी, अहो, तिची कांती पहा - कशी तकतकीत आहे, नाक कसं धरधरीत आहे, चेहऱ्यावर तरतरी आहे, हसरा चेहरा आहे, डोळे किती पाणीदार आहेत, बांधा सुडौल आहे, केसांचा शेपटा बघा एकदा! बुद्धीचं तेज, आत्मविश्वासाची तडफ, जिभेवरची सरस्वती...' काका कुठल्यातरी ट्रांसमध्ये पोहोचलेले असायचे. काकूनी मुद्दाम खाली पाडलेल्या भांड्याच्या आवाजाने त्यांची तंद्री भंग पावायची.
मी नोंदणी पद्धतीने विवाह केला तेव्हा, हेडमास्तरीण झाली तेव्हा पाठीवर थाप मारून स्वत:च पेढे वाटणारे काका, 'आमच्या मुली' म्हणून नातेवाईकांकडे भरभरून बोलणारे काका आठवतात. अगदी अलीकडच्या काळात वाढदिवशी अभीष्टचिंतन करण्यासाठी फोन केला असता काका म्हणाले, "हात थरथरतो गं आता, जास्त लिखाण जमत नाही. आपण फोनवरच बोलत जाऊ...' १५ जून २०१४ ला फोनवर मारलेल्या मनसोक्त गप्पा हा शेवटचा सुखसंवाद ठरला, असे सांगून वसुंधरा म्हणाल्या, १९६० च्या सुमारास प्रसिद्ध झालेल्या काकांच्या पुस्तकातील एक ओळ मला प्रकर्षाने आठवते. "आला क्षण, गेला क्षण... ' पुढे जोडावेसे वाटते '...उरी राहिले स्मृती क्षण'!