आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आबा यांच्या जाण्याने सुसंस्कृत नेतृत्व हरपले, सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केले दु:ख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आर. आर. पाटील यांच्या अकाली निधनाने राज्याच्या राजकीय क्षेत्राची अपरिमित हानी झाल्याची, तसेच एक सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व हरपल्याची प्रतिक्रिया सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली.
राजकारणात वेगळा ठसा उमटवला

ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचा चेहरा म्हणून आबा राजकारणात प्रतिनिधित्व करत होते. राज्याच्या अति उच्च पदापर्यंत ते गेले होते. आपल्या कार्यकर्तृत्वातून त्यांनी एक वेगळा ठसा राजकारणात उमटवला होता. ते हजरजबाबी नेते होते. त्यांच्या अकाली जाण्याने राज्याच्या राजकारणात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. - राम शिंदे, गृहराज्यमंत्री.

संवेदनशील नेतृत्व हरपले

जिल्हा परिषद सदस्य ते उपमुख्यमंत्री असा गौरवास्पद राजकीय प्रवास असणाऱ्या आर. आर. पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उटवला. राजकारणातली साधे व सरळ व्यक्तिमत्त्व असलेल्या आबांनी प्रत्येक खात्याला एक नवी दृष्टी दिली.
सलग दहा वर्षे गृहमंत्रिपद सांभाळले. साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले आबा एक प्रामाणिक राजकारणी होते. आबांचे माझे कायम मैत्रीचे संबंध होते. कधीही व कोणालाही न दुखावणाऱ्या आबांच्या जाण्याने समाजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आबांच्या निधनाने राज्याचे संवेदनशील नेतृत्व हरपले अाहे. - बाळासाहेब थोरात, आमदार.

महाराष्ट्र चांगल्या नेतृत्वाला मुकला

आर. आर. पाटील यांचे खूप कमी वयात निधन झाले. ते २५ वर्षे आमदार होते. सलग १५ वर्षे त्यांनी मंत्री म्हणून काम केले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. एका वेगळा विचार घेऊन त्यांनी कायम सामान्यांसाठी काम केले. आबांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्र चांगल्या नेतृत्वाला मुकला आहे. - दिलीप गांधी, खासदार.

चांगला मित्र गमावला

आबांच्या जाण्याने मी राजकारणातील एक चांगला मित्र गमावला आहे. ग्रामीण भागातून येऊनही त्यांनी राजकारणात स्वत:ची एक वेगळी छाप निर्माण केली. राजकारणाबरोबरच त्यांनी सामाजिक क्षेत्रातही त्यांनी मैत्री टिकवली. महाराष्ट्राने आज एका उत्कृष्ट वक्त्याला गमावले आहे. माझे त्यांच्याशी कौटुंबिक संबंध होते. त्यांच्या अकाली जाण्याने राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. - बबनराव पाचपुते, माजी मंत्री.

ग्रामीण भागाचा चेहरा हरपला

ग्रामीण भागातील अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या आबांनी आपल्या कामातून राज्याच्या मनात कायम आदर निर्माण केला. भाषेवर प्रभुत्व, विविध विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी, साधी भाषा यांमुळे त्यांचे शब्द सामान्य माणासाला आपले वाटायचे. राजकारणात एक आदर्श व्यक्तिमत्त्व असलेल्या आबांच्या निधनाने ग्रामीण भागातील विकासाचा चेहरा हरपला. - डॉ. सुधीर तांबे, आमदार.

लोकनेता हरपला

आर. आर. पाटील यांच्या माध्यमातून राज्याला अनुभवी, अभ्यासू व सक्षम नेतृत्व लाभले होते. त्यांना नागरी प्रश्नांची जाण होती, त्यांनी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. गृहमंत्री व ग्राम विकासमंत्री असताना त्यांनी अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. राज्याला पुढे नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या निधनामुळे राज्याचा लोकनेता हरपला. - संग्राम जगताप, आमदार.

शांत स्वभावाचा माणूस

आर. आर. पाटील हे उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले, परंतु त्यांचे साधे राहणीमान व शांत स्वभाव कधी बदलला नाही. त्यांनी राज्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना यशस्वीपणे राबवल्या. राजकारणात मोठ्या उंचीपर्यंत पोहोचून देखील आबांनी कधी सर्वसामान्यांची साथ सोडली नाही. - अनिल राठोड, माजी आमदार.

सुसंस्कृत राजकारणात पोकळी

ग्रामीण भागाच्या विकासाचा चेहरा, स्वच्छ प्रतिमा असलेले आबा सर्वपक्षीय तरुणांसाठी आदर्श होते. युवकांच्या मनात कायम आदर असलेल्या आबांच्या निधनाने सुसंस्कृतपणाच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. - सत्यजित तांबे.

आर. आर. आबा यांनी रोवला ग्रामविकासाचा पाया
आर. आर. आबा हे ग्रामविकासाशी घट्ट नाळ व सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व होते. राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक प्रश्नांची जाण ठेवून सहकार्य करण्याचे धोरण त्यांनी अवलंबले. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांशीही त्यांची मैत्री असायची. ग्रामविकासाचा पाया आबांनीच रोवला. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून त्याना दिशा देण्याचे कामही त्यांनी केले. अशा स्वरूपाची दूरदृष्टी असलेला, सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणारा, कार्यकर्त्यांचा खरा आधारस्तंभ हरपला आहे.'' पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, आदर्शगाव योजना.
पुढील स्लाइडवर पाहा आर आर पाटलांची काही निवडक बोलकी छायाचित्रे...