आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टक्केवारीच्या घोळात 'फेज टू'चा बोजवारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ११६ कोटींच्या सुधारीत पाणी योजनेचा टक्केवारीच्या घोळात बोजवारा उडाला आहे. तब्बल साडेचार वर्षांपासून या योजनेचे काम रखडले आहे. जुन्या अधिकारी पदाधिकाऱ्यांनी टक्केवारीसाठी सुरूवातीपासून घेतलेली भूमिका नवीन अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत कायम ठेवली. त्यातूनच योजनेच्या काही कामासाठी पुन्हा २० कोटींची निविदा मंजूर करण्यात आली. निविदेच्या या घोळामुळेच जुनी ठेकेदार संस्था तापी प्रिस्टेजने आठ दिवसांपासून योजनेचे काम थांबवले आहे. अधिकारी पदाधिकाऱ्यांनाही तेच हवे आहे. जुन्या ठेकेदाराच्या जागी पुन्हा नव्या ठेकेदाराची नेमणूक (टक्केवारीसाठी) कशी होईल, याचीच वाट ते पहात आहेत.

केंद्र शासनाच्या युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी फेज टू योजनेचे काम आठ दिवसांपासून बंद झाले, तरी देखील मनपा प्रशासन पदाधिकारी हातावर हात धरून बसले आहेत. वर्षभरापूर्वी मनपात सत्तांतर होऊन निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी सुरूवातीला योजनेच्या कामासाठी आढावा बैठका घेतल्या. परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. वर्षभरात कामास गती मिळण्याऐवजी कामच बंद होण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर ओढवली आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून योजनेचे काम रखडले आहे. सत्तांतर झाल्यानंतर या कामास गती मिळेल, अशी नगरकरांची अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरली आहे. योजनेच्या काही कामांसाठी पुन्हा २० कोटींची निविदा मंजूर करण्याचा घाट अधिकारी पदाधिकाऱ्यांनी घातला. जुन्या ठेकेदाराशी झालेल्या करारनाम्याचा भंग करून, तसेच शासनाची परवानगी घेता ही निविदा मंजूर करण्यात आली असल्याचा आक्षेप अनेकांनी घेतला आहे. संबंधित ठेकेदाराकडून टक्केवारीचा हवाला मिळाल्यानंतरच ही निविदा मंजूर करण्यात आली असल्याचे स्थायी समितीच्या एका माजी पदाधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वीच (ऑफ रेकॉर्ड) स्पष्ट केले होते. यावरूनच टक्केवारीच्या घोळात फेज टूचा कसा बोजवारा उडाला, ते स्पष्ट होते. या बेकायदेशीर निविदा प्रकरणामुळे जुन्या ठेकेदार संस्थेने योजनेचे काम थांबवले आहे. शिवाय काम वेळेत केले नाही म्हण्ून मनपाने या ठेकेदाराला सहा महिन्यांपासून दररोज हजार रुपयांचा दंड लावला आहे. मनपाकडून सहकार्य मिळत नसल्यामुळेच योजनेचे काम रखडले आहे. त्यामुळे संस्थेला मोठा आर्थिक फटका बसला असून यापुढे काम करणे शक्य नसल्याचे ठेेकेदार संस्थेने सांिगतले आहे.

पदाधिकाऱ्यांनी तोडगा काढण्याएेवजी जुना ठेकेदार कधी काम सोडून जाईल त्यानंतर नवीन ठेकेदाराची नेमणूक कशी करता येईल, अशीच भूमिका घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे आणखी काही वर्षेतरी फेज टूचे पाणी मिळणे शक्य नाही.

शहराचा पाणीप्रश्न गंभीर
शहरातीलसध्याची पाणी पुरवठ्याची वितरण व्यवस्था चार दशकांपूर्वीची आहे. ही वितरण व्यवस्था खिळखिळी झाल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. खराब जलवाहिन्यांमुळे काही महिन्यांपूर्वी शहरात हजारो नागरिकांना काविळीची लागण झाली होती. वितरण व्यवस्था सक्षम नसल्याने सध्या माणशी दररोज केवळ ७० ते ८० लिटर पाणीपुरवठा होतो. हे पाणी पुरेसे नसल्याने फेज टू योजना महत्त्वाची आहे.

आणखी काही वर्षे गैरसोय
यायोजनेच्या कामासाठी शासनाकडून आतापर्यंत ६९ कोटींचा निधी आलेला आहे. त्यापैकी ५६ कोटी रुपये संबंधित ठेकेदार संस्थेला देण्यात आले. परंतु मनपाचे सहकार्य मिळाल्याने या ठेकेदार संस्थेला साडेचार वर्षात केवळ ४० ते ५० टक्के काम पूर्ण करता आले. शिवाय या कामासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे खोदकाम झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. आता कामच बंद पडल्याने नागरिकांना ही गैरसोय आणखी काही वर्षे सहन करावी लागेल.

काम सुरूच : महापौर
फेजटूचे काम बंद होऊन तब्बल आठ दिवस उलटले, परंतु याबाबत शहराचे आमदार महापालिकेचे कर्तेधर्ते महापौर संग्राम जगताप यांना काहीच माहिती नाही. योजनेचे काम बंद झालेले नसून ते सुरूच असल्याचा दावा त्यांनी दिव्य मराठीशी बोलताना केला. प्रशासनाने मात्र काम बंद केले, म्हणून ठेकेदार संस्थेला पत्र पाठवले आहे. यावरूनच अधिकारी पदाधिकाऱ्यांमध्ये कोणताही समन्वय नसल्याचे स्पष्ट होते.