आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातानंतर पळून जाताना ट्रकचालक चाकाखाली ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या विचित्र अपघातात ट्रकचालकाचाच मृत्यू झाला, तर एक पादचारी जखमी झाला. हा अपघात मंगळवारी दुपारी 3 वाजता कायनेटिक चौकाजवळघडला. पादचार्‍याच्या डोक्याला मार लागल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रत्यक्षदश्रीनी दिलेली माहिती अशी, नगर-पुणे महामार्गावरील उड्डाणपुलावरून मालट्रक (एमपी 09 एचजी 7542) कायनेटिक चौकाकडे येत होता. रस्ता ओलांडत असलेल्या कोंडिबा गाडीलकर यांना या ट्रकची धडक बसली. त्यामुळे नागरिकांनी आरडाओरडा केला. ट्रकचालकाने पळून जाण्याच्या प्रयत्नांत ट्रक दौंड रस्त्याच्या दिशेने वळवला. नागरिक पाठलाग करत असल्याचे पाहून चालकाने चालत्या ट्रकमधून उडी मारली. दुर्दैवाने ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडून त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

नंतर ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या फळांच्या हातगाड्यांच्या दिशेने गेला. तेथे लावलेल्या एका हीरो होंडा दुचाकीला (एमएच 17 जे 7246) धडकून तो बंद पडला. काही हातगाड्यांचेही नुकसान झाले. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे चौकातच वाहतुकीची कोंडी झाली. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक रंजवे यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळी आला. पोलिसांनी जमाव पांगवून ट्रकचालकाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.

ट्रकचालकाचे नाव पप्पू (पूर्ण नाव समजू शकले नाही) असून तो मध्य प्रदेशातील इंदूरचा रहिवासी आहे. दौंड रोडवरील कारखान्यात साखरेची पोती नेण्यासाठी तो येत होता, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक रंजवे यांनी दिली. जखमी गाडीलकर यांच्यावर आनंदऋषी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला असून शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.