आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर: पोलिसांची बेपर्वाई, राजकीय स्वार्थामुळे पांगरमल येथे 7 जणांचा बळी; तृप्ती देसाई यांची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर तालुक्यातील पांगरमल येथे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी शुक्रवारी भेट देऊन दारूकांडात बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले - Divya Marathi
नगर तालुक्यातील पांगरमल येथे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी शुक्रवारी भेट देऊन दारूकांडात बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले
नगर - जिल्हा पोलिस अधीक्षकांचा हलगर्जीपणा स्वार्थी राजकारणामुळे पांगरमल (ता. नगर) येथे बनावट दारूमुळे सात जणांचा बळी गेल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली. शिवसेना उमेदवाराच्या घरी झालेल्या पार्टीमुळे हा प्रकार झाला आहे. त्यामुळे कुटुंबांच्या पालनपोषणाची जबाबदारी शिवसेनेने घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. 
 
देसाई यांनी शुक्रवारी दुपारी तीन सुमारास पांगरमल गावाला भेट दिली. त्यांनी दारुकांडात बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच ग्रामस्थांशीही चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, “नगर जिल्ह्यात इतकी मोठी घटना होते, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, पालकमंत्री राम शिंदे किंवा खासदार दिलीप गांधी येथे साधी भेट देत नाहीत, या वरून संवेदनाहिन राजकारण्यांचे दर्शन घडले. बनावट दारूमुळे गोरगरिबांचे जीव जाताहेत, पण कोणाचेही लक्ष नाही.” या सर्व राजकीय हत्याच असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. निवडणुका तरुणांना दारू पिण्याचे प्रशिक्षण देणारे केंद्रे बनल्या आहेत, असे स्पष्ट करून देसाई यांनी निवडणुकांच्या वेळी पूर्ण दारुबंदी करावी, अशी मागणी केली. जिल्हा रुग्णालयातील दारूच्या कारखान्याबाबत त्या म्हणाल्या, पोलिसांना शंभर टक्के हप्ते मिळत होते. त्यांच्या आशीर्वादामुळे हा धंदा सुरू होता. गृहमंत्रिपद असलेले देवेंद्र फडणवीस यांनी पांगरमलला भेट दिली नाही. हाच त्यांचा पारदर्शी कारभार आहे का? राज्यातील सर्व अवैध धंदे गृहमंत्र्यांनी बंद करावेत. ते जमत नसेल, तर त्यांनी गृहमंत्रिपद सोडावे, अशी मागणीही त्यांनी केली. 
 
यावेळी ग्रामस्थांनी दारूला कायमचे हद्दपार करण्याचा संकल्प केला. यावेळी पाथर्डीचे सभापती संभाजी पालवे, सरपंच बापूसाहेब आव्हाड, उपसरपंच देविदास आव्हाड, डॉ. विजय मकासरे आदी उपस्थित होते. माणिक दौंडीच्या श्रीक्षेत्र महादेव गड येथील महंत आदिनाथ आंधळे यांनी यावेळी दारुकांडात बळी पडलेल्या राजेंद्र आंधळे यांचा मुलगा अजय याचे संपूर्ण पालकत्व स्वीकारले. संभाजी पालवे यांनी अजयची बहीण भक्तीच्या नावे दहा हजारांची मुदत ठेव ठेवली.
 
तरुणांच्या निवेदनाकडे दुर्लक्ष 
पांगरमलच्या काही तरुणांनी आधी परिसरात होणारी अवैध दारुविक्री इतर धंदे बंद करावेत, असे निवेदन तीन वर्षांपूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले होते. त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, अशी कैफियत या तरुणांनी देसाई यांच्यासमोर मांडली. 
 
दारूमुक्तीसाठी राज्यभर आंदोलन 
दारुमुळे कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. कोपर्डीसारखी घटना दारूमुळेच झाली, असे सांगून देसाई म्हणाल्या, ‘दारुमुक्त बिहार’ होऊ शकतो, तर ‘दारुमुक्त महाराष्ट्र’ का नाही? मार्चपासून नगर जिल्ह्यातूनच आंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, दारूमुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलन... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...