आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालगंधर्वांनी ‘तुकाराम’चा मुहूर्त केला होता नगरमध्ये..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- ‘तुकाराम’ हे नाटक बालगंधर्वांना करायचे होते. त्याचा मुहूर्त त्यांनी नगरमध्येच केला होता, पण दुर्दैवाने नंतर तब्येत ढासळल्याने त्यांना हे नाटक रंगमंचावर आणता आले नाही.. ही आठवण सांगितली ज्येष्ठ संगीतकार माणिक हाथीदारू यांनी.

नटश्रेष्ठ बालगंधर्वांचा सोमवारी (15 जुलै) स्मृतिदिन. यानिमित्त या महान कलावंताच्या आठवणींनी नगरमधील जाणत्या रसिकांनी व संगीताच्या अभ्यासकांनी उजाळा दिला. हाथीदारू म्हणाले, बालगंधर्वांची नाटके आणि मैफली नगरच्या कौन्सिल हॉल, सोसायटी हायस्कूलमधील मोने कलामंदिर, तसेच चितळे रस्त्यावरील बागडे थिएटरमध्ये होते. लोकल बोर्डाच्या इमारतीतील बेलखालील सभागृह, तसेच मिरीकरांच्या हॉलमध्येही कार्यक्रम झाले आहेत. बालगंधर्वांच्या काही नाटकांचे पहिले प्रयोग नगरला झाले आहेत. इथे शुभारंभ केला की, यश मिळते अशी त्यांची र्शद्धा होती. अखेरच्या काळात त्यांना तुकाराम नाटक करायचे होते. त्याच्या प्रारंभीच्या बैठका नगरमध्ये झाल्या. बागडे थिएटरमध्ये या नाटकाचा मुहूर्तही करण्यात आला, पण नंतर बालगंधर्वांची प्रकृती ढासळली. त्यामुळे या नाटकाचे प्रयोग होऊ शकले नाहीत.

बालगंधर्व 1967 मध्ये गेले. त्याच्या आधी सहा महिने ते नगरला आले होते. त्यांनी नाट्यगीते आणि भजने म्हटली होती. या मैफलीला उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळाले. या गाण्यांचे मी रेकॉर्डिंगही केले. ती ध्वनिफीत आता पुणे आकाशवाणी केंद्राकडे आहे, असे हाथीदारू यांनी सांगितले.

ज्येष्ठ चित्रकार वसंत विटणकर म्हणाले, 1959 मध्ये बालगंधर्वांच्या गाण्याचा कार्यक्रम जिल्हा वाचनालयासमोरील पाठक वाड्यात होता. बडोदे संस्थानचे दरबारी गायक लहानु मास्तर यांच्याकडे ते आले होते. पेटीवर होते हरिभाऊ विश्वनाथ आणि तबल्यावर होते बाबूराव जाधव. समोर बसून मी बालगंधर्वांचे चित्र काढले. त्यांनाही ते आवडले. मी स्वाक्षरी मागितली, पण वृद्धापकाळाने हात हलत असल्याने सही नाही करता येत, असे ते म्हणाले. मात्र, एक गाणे झाल्यानंतर त्यांनी मला बोलावून मुठीत पेन पकडून थरथरत्या हाताने स्वाक्षरी केली. ती माझ्यासाठी लाखमोलाची ठेव बनली आहे.

संगीतात पीएच. डी. केलेल्या डॉ. धनश्री खरवंडीकर म्हणाल्या, नाथ हा माझा, खरा तो प्रेमा, नरवर कृष्णासमान, प्रभू अजी गमला ही नाट्यगीते अजरामर झाली ती केवळ बालगंधर्वांमुळे. आजही ही नाट्यगीते ऐकताना जुन्या पिढीतील रसिकांना त्यांच्या अभिनयाने व स्वर्गीय गायकीने नटलेल्या रुक्मिणी, भामिनी, सुभद्रा अशा अजरामर भूमिकांची आठवण झाली नाही तरच नवल. खर्‍या अर्थाने त्यांनी रंगभूमीवर अधिराज्य गाजवले. तब्बल 50 वर्षे स्त्रीभूमिका सादर करून रसिकांची मने जिंकली.


रसिकांतर्फे हृद्य सत्कार
बालगंधर्वांना नगरविषयी विशेष प्रेम होते. महिना दोन महिने गंधर्व नाटक कंपनीचा नगरला मुक्काम असे. सरदार मिरीकर, बाळासाहेब देशपांडे, रानडे, राजहंस, बागडे अशा संगीतप्रेमी कुटुंबांत गाण्याच्या मैफली रंगत. 6 फेब्रुवारी 1959 रोजी नगरपालिका सभागृहात बालगंधर्वाचा नगरकरांतर्फे हृद्य सत्कार झाला होता. नगरच्या रुस्तुमकाका हाथीदारू यांना तर ‘प्रतिबालगंधर्व’च म्हणत असत.
- डॉ. धनश्री खरवंडीकर