आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटिशांमुळे तुकारामांची गाथा जागतिक पातळीवर, डॉ. धोंडगे यांचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- ज्ञानशास्र,मानसशास्र, अर्थशास्र यामध्ये संत तुकारामांच्या अभंगांचा प्रभाव असल्याने जगभर तुकाराम गाथेचा अभ्यास केला जातो. ब्रिटिशांनी तुकाराम गाथेला खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर नेण्याचे काम केले. त्यामुळेच आज जगात सर्वाधिक तुकारामांच्याच काव्यावर लिहिले जात असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. दिलीप धोंडगे यांनी केले.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमालेत "तुका झाला आकाशाएवढा' या विषयावरील व्याख्यानाचे पाचवे पुष्प गुंफताना प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे होते. स्वागत डॉ. आर. एस. जहागीरदार यांनी केले. डॉ. धोंडगे म्हणाले, तुकाराम भागवत धर्माचा कळस असल्याचे मानले जाते. महाराष्ट्राची संस्कृती ही वारकरी संस्कृती असून भागवत धर्म आहे. राज्याच्या लोकसंख्येच्या दहा टक्के लोक वारकरी आहेत. ज्ञानेश्वरीच्या तोडीचा ग्रंथ जगात कोठेही नाही. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानेश्वरांनी रचला आणि तुकारामाने कळस रचला, ही बाब अत्यंत वास्तववादी आहे. तत्त्वज्ञान हे सृष्टीवर आधारित असते, तेच संतांनी सांगितले. भक्तीमध्ये उर्मी असते. महाराष्ट्रातील बायका दळताना ओव्या गातात, ज्ञानेश्वरांनी सुद्धा ओव्यांचा आधार घेतला. ज्ञानेश्वर विष्णुचा अवतार होते. एकनाथी भागवत एकनाथांनी लिहिला.

ब्रिटिश भारतात आल्यावर आकलन शक्तीच्या जोरावर भारतीय परंपरेतील अभंगांचा अभ्यास केल्यावर त्यांना ख्रिस्ती धर्माचा प्रचार प्रसार करता आला नाही. अभंग हे उत्तम साहित्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तुकारामांनी लिहून ठेवलेल्या अभंगगाथांचा त्यांनी अभ्यास केला. वारकारी संप्रदायातील तज्ज्ञांना हाताशी धरून १८६९ मध्ये ब्रिटिशांनी २४ हजार रुपये खर्च करून तुकारामांची गाथा प्रसिद्ध केली. आजही तीच तुकारामांची गाथा अस्तित्वात आहे. तुकारामाचे रशियन भाषेत वाड्.मय तयार झाले. ब्रिटिशांना संतांच्या कार्याची महती समजली. पण तुकारामांची गाथा तयार करण्याचे काम केले.

जगभर तुकाराम त्यामुळे गेले. तुकारामांच्या काव्याएवढे श्रेष्ठ काव्य जगात दुसरे कोणतेही नाही. चारशे वर्षे तुकारामांची अभंग गाथेचा धन म्हणून वापर झाला. "ज्याच्या घरी नाही तुकाराम गाथा! त्याच्या शिरी मारा चार लाथा' हे ब्रीद वाक्य आचार्य अत्रे यांनी लिहून ठेवले, असे डॉ. धोंडगे यांनी यावेळी सांगितले.
व्याख्यानमालेत बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. दिलीप धोंडगे

गांधीही अभंग म्हणत
महात्मागांधी येरवड्याच्या जेलमध्ये असताना त्यांनी तुकाराम गाथेचा अभ्यास करून १६ अभंग इंग्रजीत अनुवाद करून ठेवले. ते त्यांनीच प्रसिद्धही केले. सायंकाळच्या प्रार्थनेत महात्मा गांधी तुकारामाचा अभंग गात असे. सत्येंद्रनाथ टागोर महाराष्ट्रात आल्यावर त्यांनी तुकारामाचे अभंग बंगाली भाषेत लिहून रवींद्रनाथ टागोरांना पाठवले. महाराष्ट्रातला जगभर पोहोचलेला एकमेव कवी म्हणजे तुकाराम यांचा आज आवर्जून उल्लेख आहे. काव्यातून उच्च असे तत्त्वज्ञान तुकारामांनी सांगितले. तुकारामाचा अभंग समजण्यासाठी वारकरी लागतो. जगात सर्वाधिक तुकारामाच्या काव्यावर लिहिले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संत गाडगे महाराजांवर तुकारामाच्या विचारांचा प्रचंड पगडा होता, असे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...