आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘खळ्ळ खट्याक्’ केले असते, तर मानधन मिळाले नसते..

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी मानधन नाकारल्याने अभिनेते डॉ. गिरीश ओक फार खचून गेले होते. त्यावेळेस त्यांना मानसिक आधाराची गरज होती. त्यांच्यावर इतका दबाव होता की, ते स्क्रीप्टमधले डायलॉग विसरायला लागले. आम्ही ‘खळ्ळ खट्याक’ आंदोलन केले असते, तर डॉ. ओक यांना त्यांचे मानधन मिळाले नसते. शांततेच्या मार्गाने आम्ही हा प्रश्न हाताळला, असे शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष व ‘होम मिनिस्टर’फेम आदेश बांदेकर यांनी सोमवारी सांगितले.

एका दूरचित्रवाणी मालिकेच्या चित्रीकरणासाठी बांदेकर येथे आले आहेत. सोमवारी त्यांनी रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांची सावेडी येथील अदिती अपार्टमेंटमधील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी ते म्हणाले, चित्रपट कलावंत व बॅकस्टेज आर्टिस्टच्या समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. कलावंतांवर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात मी नेहमीच लढा देणार आहे. याचाच एक भाग म्हणून डॉ. ओक यांच्यामागे आम्ही उभे राहिलो. डॉ. ओक यांचा आवाज चित्रपटात वापरल्यानंतर त्यांचे मानधन वर्मा यांनी दिले नव्हते. जेव्हा मानधन मिळून वर्मा यांनी माफी मागितली तेव्हा डॉ. ओक यांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून मी सुखावलो, असेही ते म्हणाले.

वैयक्तिक संबंध व राजकारण मी एकत्र येऊ देत नाही. रसिक ग्रुपच्या कार्यक्रमासाठी मी जेव्हा नगरला यायचो, तेव्हा मला माहितीही नव्हते की, शिवसेनेकडून तिकीट मिळून मी निवडणूक लढवेन, असे बांदेकर म्हणाले.

येलूलकर यांनी बांदेकर यांचा सत्कार केला. ‘आदेश भावजीं’ना अचानक आलेले पाहून अपार्टमेंटमधील महिलांना सुखद धक्का बसला. त्यांना भेटण्यासाठी गर्दी झाली होती.

रसिक ग्रुपचे भरभरून कौतुक
रसिक ग्रुपतर्फे मागील 13 वर्षांपासून गुढी पाडव्यानिमित्त सावेडीत आयोजित करण्यात येणार्‍या संगीत मैफलीचे आदेश बांदेकर यांनी विशेष कौतुक केले. या कार्यक्रमात सुरूवातीला सहभागी होण्याची संधी मला मिळाली, याचा आनंद वाटतो. आता या कार्यक्रमाचे स्वरूप व्यापक झाले असून हा कार्यक्रम म्हणजे नगरची सांस्कृतिक ओळख बनला आहे. अनेक नामवंत कलावंत या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उत्सुक असतात, असे सांगत आदेशने रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांचे अभिनंदन केले.