आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोनशे बारा जनावरांची कत्तलखान्यातून सुटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांनी पकडलेली २१२ जनावरे जीवदया संस्थेमध्ये दाखल करण्यात आली आहेत. छाया : विवेक भिडे - Divya Marathi
पोलिसांनी पकडलेली २१२ जनावरे जीवदया संस्थेमध्ये दाखल करण्यात आली आहेत. छाया : विवेक भिडे
संगमनेर - येथील कत्तलखान्यावर शहर पोलिसांनी टाकलेल्या छाप्याचे काम सोमवारी पहाटेपर्यंत सुरू होते. छाप्यादरम्यान पोलिसांनी २१२ जनावरांची सुटका केली असली, तरी तेथे आढळलेल्या मांसावरून शेकडो वासरे, गायी आणि बैलांची कत्तल करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून बारा आरोपी फरार आहेत.

भारतनगर येथील कत्तलखान्यात गायी, बैल आणि वासरांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात होती. येथील गोवंश मांस राज्यात अनेक ठिकाणी जाते. राज्यात झालेल्या बहुतांश कारवायांमध्ये मांस संगमनेरमधून आल्याचे पुढे आले. मात्र, या कत्तलखान्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखवले जात नव्हते. रविवारी सायंकाळी पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक शिवाजी पाळंदे, व्ही. एम. घनवट, उपनिरीक्षक अन्सार इनामदार अन्सार शेख यांच्या पथकाने या कत्तलखान्यावर छापा टाकला. छाप्यात जनावरांच्या कत्तली केल्या जात असल्याचे आढळले.

पोलिसांनी २०० हून अधिक जनावरांची मुक्तता केली. नऊ हजारांहून अधिक किलो मांस तेथे आढळून आले. चार आरोपी पोलिसांच्या हाती लागले, तर अन्य फरार झाले. पोलिस हेड कान्स्टेबल सुरेश बनसोडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात पहाटे दोन वाजता आरोपींविरोधात महाराष्ट्र अॅनिमल कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक निरीक्षक शिवाजी पाळंदे करत आहेत.

छाप्यात पोलिसांना मिळालेले नऊ हजार दोनशे किलो गोमांस नष्ट करण्यासाठी पोलिसांची मोठी धावपळ उडाली होती. नगरपालिकेच्या असहकार्यामुळे पोलिसांना जेसीबीचालक मिळू शकला नाही. अखेर पोलिसांनीच व्यवस्था करत जेसीबीचालक उपलब्ध केला आणि मांस संगमनेर खुर्द येथील कचरा डेपोत खड्डा घेऊन पुरले.

आरोपींच्या शोधासाठी पथके
नावेदजावेद कुरेशी, मोहंमद नासीर जम्मूल शेख (२०, भारतनगर), अलीम जलील कुरेशी (१९, मोगलपुरा), शफीक मोहंमद कुरेशी (२२, मोगलपुरा) या चौघांना पोलिसांनी अटक केली. एका अल्पवयीन युवकास बालसुधारगृहात पाठवण्यात आले. वसीम अब्दुल कुरेशी, अब्दुल कादर कुरेशी, लाला रज्जाक कुरेशी, जावेद हसन कुरेशी, कदीर बुढण कुरेशी, समीर हसन कुरेशी, लतीफ सांडू कुरेशी, जहीर इर्शाद कुरेशी, तौसिफ अरिफ कुरेशी, हाजी गुलाम कुरेशी, परवेज हाजी कुरेशी, शाहीद हाफीज शेख हे आरोपी फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

सोळा लाखांचा मुद्देमाल
याछाप्यात पोलिसांना १७१ लहान वासरे, ४१ गाय, बैल, ९२०० किलो गोवंश जातीचे मांस, मेलेल्या जनावरांची १०० कातडी आणि वाहतुकीसाठीचा एक टेम्पो मिळाला. सुमारे सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिवंत जनावरांना रात्रीतून जीवदयामध्ये दाखल करण्यात आल्याने त्यांना जीवदान मिळाले.

सर्वात मोठी कारवाई
राज्यातगोवंश हत्याबंदी कायदा मार्चला लागू झाल्यानंतर पहिली कारवाई मालेगाव येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी केली. त्यानंतर राहुरीत कारवाई झाली. मात्र, कत्तलखान्यावर छापा टाकून गाय, बैलांसह २१२ लहान वासरे आणि मांस हस्तगत करण्याची ही राज्यातील सर्वात मोठी कारवाई ठरली.

माहितीनंतर केली कारवाई
काही दिवसांपूर्वी समनापूर शिवारात गोमांस वाहतूक करणारे वाहन पकडल्यानंतर त्याचे धागेदोरे या कत्तलखान्यापर्यंत जात होते. समनापूर प्रकरणात संबंधितांची नावे निष्पन्न झाल्यानंतर हा व्यवसाय बंद करण्याची समज देण्यात आली. तरीही हा व्यवसाय सुरूच असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई केली. पोलिस अधीक्षक आमची माहिती एकत्रित करून ही कारवाई केली. नितीन चव्हाण, पोलिस निरीक्षक.
बातम्या आणखी आहेत...