राहुरी- मुळानदीपात्रात वाळूउपसा करताना १५ फूट उंचीची नदीकाठची थडी कोसळल्याने दोन सख्ख्या भावांचा वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. मुळा धरणाजवळ डिग्रस केटीवेअरजवळ सोमवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेत बारागाव नांदूर येथील ज्ञानदेव जाधव (२९) मच्छिंद्र जाधव (३५) हे दोघे मरण पावले.
थडी कोसळून मजूर दबल्याची घटना दुपारी घडली. या घटनेनंतर वाळूचा उपसा करणाऱ्या इतरांनी पोबारा केला. वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने मच्छिंद्रच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला, तर ज्ञानदेवच्या हात-पायाची मोडतोड झाली. या घटनेची वाच्यता सायंकाळी झाल्याने परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले. वाळूच्या ढिगाऱ्याखाली दोघे तरूण गाडले गेल्याचे समजताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या दोघांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. सायंकाळी सात वाजता दोघांचे मृतदेह ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले.
वाळूतस्करीचा केंद्रबिंदू केटीवेअर
वाळूतस्करीचा केंद्रबिंदू म्हणून डिग्रस केटीवेअर परिसराची नगर, नाशिक पुणे जिल्ह्यात ओळख आहे. केटीवेअरजवळ वाळूउपसा करण्यासाठी माफियांनी गेल्या अनेक वर्षांपासून धुमाकूळ घातला आहे. महसूल पोलिसांचे दुर्लक्ष अनेकांच्या जीवावर बेतले आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या थड्या उकरून वाळूउपसा करण्याचा उद्योग या भागात सुरू आहे.