आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालकांचा हलगर्जीपणा बेतला दोघींच्या जीवावर, चुकींमुळे गमवावे लागले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगर-औरंगाबाद महामार्गावर एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटना सोमवारी रात्री ते मंगळवारी दुपारपर्यंत नेवासे तालुक्यातील घोडेगाव पांढरीपुलाजवळ घडल्या.
पहिला अपघात रस्त्यात धोकादायक पद्धतीने उभ्या असलेल्या मालट्रकला टेम्पो धडकून, दुसरा अपघात रस्त्यात कुत्रे आडवे आले म्हणून, तर तिसरा अपघात पोलिसांचे वाहन पाहून पळण्याच्या प्रयत्नांत असलेल्या जीपचालकामुळे झाला. पहिला अपघात सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घोडेगावातील नदीच्या पुलावर घडला.
पुलावर नगरच्या दिशेने तोंड करून एक मालट्रक एमएच २१ - ९००७ उभा होता. ट्रकचालकाने वाहन रस्त्याच्या कडेला धोकादायक पद्धतीने लावले होते. शिवाय पार्किंग लाईट किंवा टेललँपही सुरू नव्हते. पाठीमागून आलेल्या टाटा मॅजिक टेम्पोचालकाची त्याला धडक बसली. ही धडक इतकी जोराची होती, की ट्रकमध्ये ठेवलेल्या लोखंडी सळ्या टेम्पोचालक त्याच्या शेजारी बसलेल्या मुलीच्या शरीरातून आरपार गेल्या. टेम्पोचालक शिवाजी दशरथ आढाव (४६, चांदा) गंभीररित्या जखमी झाला, तर त्याची मुलगी कावेरी शिवाजी आढाव (वय १०) जागीच ठार झाली.

काही ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. तोपर्यंत ट्रकचालक वाहन तेथेच सोडून पसार झाला होता. मुलगी जागीच ठार झाली होती. ग्रामस्थांनी गॅसकटरच्या साह्याने सळ्या कापून शिवाजी आढाव कावेरीला बाहेर काढले. याप्रकरणी बुधवारी रात्री शिवाजी आढाव यांची फिर्याद नोंदवण्यात आली. त्यानुसार सोनई पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरणे, मोटार वाहन अधिनियम, रस्त्यात धोकादायक पद्धतीने वाहन उभे करणे आदी कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल व्ही. बी. गोल्हार करत आहेत.
दुसरा अपघात पांढरी पुलानजीक नगर-औरंगाबाद महामार्गावरच घडला. याप्रकरणी सोनल विठ्ठल मिसाळ (३०, मुंढवा, पुणे) यांनी सोनई पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोनल मिसाळ त्यांची बहीण प्रिया (३०) यांच्यासह सुझुकी एस क्रॉस वाहनातून नगरच्या दिशेने येत होत्या. रस्त्यात कुत्रे आडवे आले म्हणून चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला आदळून अपघात झाला. त्यामध्ये प्रिया मिसाळ जागीच ठार झाल्या, तर सोनल गंभीररित्या जखमी झाल्या. याप्रकरणी पोलिसांनी कारचालक नीलेश पुरुषोत्तम बरडे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

तिसरा अपघात मंगळवारी सकाळी साडेदहाला घोडेगावातील सेंट अॅनिज हॉस्पिटलसमोर घडला. खासगी जीपचालक (एमएच १७ एजी ४२८७) अवैध प्रवासी बसवून वाहन नगरकडे घेऊन येत होता. समोरून महामार्ग पोलिसांची जीप आल्याचे पाहून त्याने मध्येच दुभाजक ओलांडून यू-टर्न घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नगरकडून येणाऱ्या चिंचवड-भुसावळ या एसटी बसची जीपला धडक बसली. जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेली.

या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. बस जीपमधील प्रवासीही गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे महामार्ग पोलिसांचे वाहन अपघात होताच तेथून निघून गेले.

पोलिसांची बेफिकिरी
अवैधप्रवासी वाहतुकीवर कारवाई करणारे महामार्ग पोलिसांचे वाहन पाहून जीपचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न बस मॅक्सच्या अपघातास कारणीभूत ठरला. अपघातानंतर जखमींना मदत करणे हे पोलिसांचे काम. परंतु या अपघाताच्या वेळी महामार्ग पोलिस नसते झंझट नको म्हणून घटनास्थळ सोडून निघून गेले. त्यांची बेफिकिरी पाहून प्रत्यक्षदर्शीही अचंबित झाले. अखेर ग्रामस्थांनीच जीप बसमधील प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढून उपचारांसाठी दाखल केले. अपघातानंतर सोनई पोलिसही घटनास्थळी उशिरा आले.

संशयास्पद फिर्याद
घोडेगावातील पुलावर झालेल्या ट्रक टेम्पोच्या अपघातात ट्रकचालकासह टेम्पोचालकाचीही चूक असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. टेम्पोचालक मुलीला घेऊन भरधाव वेगाने वाहन चालवत होता. शिवाय त्याने मद्य प्राशन केले असल्याचेही ग्रामस्थांनी पोलिसांना सांगितले. मात्र, सोनई पोलिसांनी या अपघाताचा गुन्हा दोन दिवस उशिरा नोंदवला. जखमी टेम्पेाचालकाची फिर्याद नोंदवण्यात आली असून ट्रकचालकाला आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे या गुन्ह्याची नोंद करताना पोलिसांचा नेमका काय हेतू आहे, याबद्दल घोडेगाव, सोनई चांदा परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.