आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिरीतील ढिगा-यात गाडले गेले दोन मजूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - विहिरीत आडवा बोअर घेत असताना दोन मजूर मातीच्या ढिगा-याखाली अडकले. ही घटना गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा गावात घडली. दोन्ही मजूर निमगाव वाघा येथील रहिवासी आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक, महसूल अधिकारी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून रात्री उशिरापर्यंत मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते.

पिंपळगाव कौडातील सर्व्हे नंबर दोनमध्ये रावसाहेब पाटीलबा केदार यांची जुनी विहीर आहे. ती पाच परस खोल असून पूर्णपणे दगडी बांधकाम केलेली आहे. या विहिरीत शनिवारपासून आडवे बोअर घेण्याचे काम सुरु होते. निमगाव वाघा येथील सागर पाराबाई काळे (३०) दत्तात्रेय बबन खळदकर (३१) हे या कामावर होते. गुरुवारी बोअरचे काम संपणार होते. दुपारी जेवण आटोपून चार वाजता पुन्हा ते कामाला लागले. आडवे बोअर घेण्यासाठी मजुरांनी इंजिन सुरु केले. इंजिन बोअरच्या कंपनांमुळे विहिरीतील दगड ढासळले. क्षणार्धात संपूर्ण विहीर ढासळून आत उतरलेले दोन्ही मजूर दगड मातीच्या ढिगा-याखाली गाडले गेले.

या घटनेची माहिती समजताच पोलिस, प्रांताधिकारी वामन कदम, तहसीलदार सुधीर पाटील, जिल्हा परिषद सदस्य माधव लामखडे, पंचायत समिती सभापती संदेश कार्ले यांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन पथकही घटनास्थळी आले. दोन जेसीबी एका पोकलेनच्या साह्याने माती उपसण्याचे काम सुरु होते. रात्री आठपर्यंत मजुरांचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे ढिगारा उपसण्याचे काम सुरुच राहील, असे सूत्रांनी सांगितले. रात्री अंधारामुळे मदतकार्यात अडथळा येत होता.