आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोले तालुक्यात आढळले दोन बिबटे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले - वनविभाग जागतिक वनदिन साजरा करत असतानाच शुक्रवारी तालुक्यातील आढळा खोर्‍यात डोंगरगाव शिवारात एका बिबट्याचा मृतदेह आढळला. तर वीरगाव शिवारातील उसाच्या फडात एक बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात अडकला आहे.

डोंगरगाव येथील बाळासाहेब मुरकुटे यांच्या डाळिंबाच्या शेतात गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास काही कुत्री मृत बिबट्यास ओढून नेत असल्याचे आढळून आले. एरवी कुत्र्यांना भक्ष्य करणार्‍या बिबट्याच्याच शरीराचे लचके कुत्रे तोडताना दिसून आले. ही घटना मुरकुटे यांनी पाहिली. त्यानंतर संगमनेरचे उपविभागीय वनाधिकारी शिवाजी फटांगरे यांनी घटनास्थळी येऊन बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. पशुधन अधिकारी डॉ. एल. बी.भांगरे यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. शुक्रवारी सकाळी वनविभागाकडून बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वीरगाव येथील सुपारमळा शिवारातील बाळासाहेब वाकचौरे यांच्या उसाच्या शेतात बिबट्याला पकडण्यासाठी वनखात्याने सापळा लावला होता. या सापळ्यात बिबट्या अडकला. वनखात्याने बिबट्यास सुगाव येथील रोपवाटिकेत आणले आहे. या बिबट्याची परिसरात दहशत होती. बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील शेतकर्‍यांनी सुटकेचा श्वास सोडला.


वीरगाव शिवारात आणखी दोन बिबट्यांचा वावर
सापळ्यात जेरबंद झालेल्या या बिबट्याच्या डरकाळ्या दररोज वीरगावच्या शेतकर्‍यांना ऐकू येत होत्या; परंतु उसाच्या व मका पिकाच्या शेतात आणखी दोन बिबट्याचा वावर आहे. एका बिबट्याला पकडून नेल्याने अन्य बिबटे चवताळून पशुधनाबरोबर शेतकर्‍यांवर हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे वनखात्याने तातडीने बंदोबस्त करावा.’’ बाळासाहेब दातीर, शेतकरी.


वीस दिवसांपूर्वी बिबट्याचा मृत्यू झाला असावा
डोंगर शिवारात वीस दिवसांपूर्वी बिबट्याचा मृत्यू झाला असावा. कुत्र्यांनी बिबट्याचे लचके तोडल्याने हा बिबट्या नर आहे की, मादी अद्याप समजू शकले नाही. बिबट्याच्या त्वचेच्या व हांडाचे भाग पुणे येथील झुऑलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या प्रयोगशाळेत पाठवले. प्रयोगशाळेतील अहवालानंतर बिबट्याच्या मृत्यूचे कारण समजेल.’’ शिवाजी फटांगरे, उपविभागीय वनाधिकारी, संगमनेर.