आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन मंत्र्यांची उपस्थिती अन् जोरदार जल्लोष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर -राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांच्या गळ्यात दुसर्‍यांदा महापौरपदाची माळ पडली. यामागे आघाडीच्या मंत्र्यांचेही कष्ट कारणीभूत आहेत. महापौर निवडीच्या वेळी स्वत: कृषिमंत्री राधाकृष्ण विखे व पालकमंत्री मधुकर पिचड आवर्जून उपस्थित राहिले. त्यांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली. त्यामुळे अडीच वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजप युतीला आता विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. नगरकरांनी कोणत्याच पक्षाला बहुमत दिले नव्हते. त्यामुळे आघाडीप्रमाणेच युतीकडे देखील सत्ता स्थापन करण्याची संधी होती. त्यासाठी प्रयत्न केला असल्याचे युतीकडून शेवटपर्यंत दाखवण्यात आले, मात्र हे प्रयत्न केवळ ‘फार्स’च ठरले.


आघाडीचे जोरदार शक्तिप्रदर्शन
निवड प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच महापालिका कार्यालयासमोर आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ठाण मांडले होते. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महापौर व उपमहापौरपदी जगताप व कोतकर यांचीच निवड होणार, असा कार्यकर्त्यांना विश्वास होता. जगताप यांची महापौरपदी निवड होताच महापालिकेसमोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. काही कार्यकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडून थेट सभागृहाकडे धाव घेतली. त्यामुळे महापालिकेला जत्रेचे स्वरूप आले होते. जगताप व कोतकर यांचा सत्कार करण्यासाठी आलेल्या मंत्री राधाकृष्ण विखे व मधुकर पिचड यांचीदेखील कार्यकर्त्यांच्या गर्दीतून वाट काढताना मोठी दमछाक झाली. जगताप व कोतकर यांच्या नावाच्या जयघोषाने संपूर्ण महापालिका दणाणून गेली होती. महापालिकेसमोर गुलालाचा अक्षरश: थर साचला होता. जगताप यांना खांद्यावर घेत कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केला.


सत्तेचे किंगमेकर ‘काका’

महापालिका निवडणुकीचा निकाल (16 डिसेंबर) जाहीर होताच सत्ता स्थापन करण्यासाठीचे सर्व सूत्र राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप (काका) यांनी हाती घेतले. राष्ट्रवादीला 18, तर काँग्रेसला 11 जागा मिळाल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी लागणार्‍या आणखी 6 जागांचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यात 9 अपक्ष व मनसेच्या 4 नगरसेवकांची भूमिका निर्णायक ठरणार होती. अपक्षांपैकी 4 नगरसेवक युती पुरस्कृत होते. शिवाय मनसेचा सुरूवातीचा कौलही युतीच्या बाजूने होता. त्यामुळे सत्तेचे समीकरण आघाडी कसे जुळवणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु काकांनी सुरूवातीलाच 5 अपक्षांना राष्ट्रवादीत सामील करून घेतले. त्यानंतर मनसे नगरसेवकांच्या गुप्त बैठका घेत त्यांना सत्तेचे महत्त्व पटवून दिले. आघाडीच सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट होताच उर्वरित युती पुरस्कृत दोन नगरसेवकही आघाडीत सामील झाले. विशेष म्हणजे हे सर्व एकट्या काकांनीच घडवून आणले. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी व काँग्रेसला याची साधी कल्पनाही नव्हती. सर्व काही काका म्हणतील, तसेच घडत गेले. त्यामुळे ‘काका’च खरे सत्तेच किंगमेकर ठरले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांनीही त्याची कबुली देखील दिली. संख्याबळ जुळवण्यात काका माहिर आहेत, अशी प्रतिक्रिया काकडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली होती.



सर्वांनी मिळून काम केले
सत्ता स्थापण्यासाठी अपक्षांसह मनसेनेही साथ दिली. नागरिकांना परिवर्तन हवे होते. त्यामुळेच त्यांनी आघाडीच्या हातात सत्ता दिली. आता शहराचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आघाडीचे नगरसेवक प्रयत्न करतील. काँग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री, पदाधिकारी व कार्यकर्ते सर्वांनी एकत्र मिळून काम केले. त्यामुळेच सत्ता स्थापन करता आली.’’ मधुकर पिचड, पालकमंत्री

आता जबाबदारी वाढली..
नागरिकांनी विश्वास टाकल्यामुळेच आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या. आघाडीची सत्ता स्थापन झाली असली, तरी आता जबाबदारी वाढली आहे. नगरकरांना जे हवे ते देण्याचा प्रयत्न करणार आहे. आश्वासने पूर्ण करण्यास आघाडीचे महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवक प्राधान्य देण्यात येणार आहेत.’’ राधाकृष्ण विखे, कृषीमंत्री.

विकासाचे नवे पर्व सुरू करू..

नागरिकांनी टाकलेला विश्वास खरा करून दाखवणार आहे. त्यासाठी शहरात विकासाचे नवीन पर्व सुरू करणार आहे. उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्या कारभारात ढवळाढवळ करणार नाही. महिला काँग्रेसच्या माध्यमातून त्या स्वतंत्रपणे कारभार करतील. शहर विकास हे एकमेव ध्येय समोर ठेवून काम करणार आहे.’’ संदीप कोतकर, गटनेता, काँग्रेस.

निर्णायक अपक्ष
स्वप्नील शिंदे
कुमार वाकळे
नसीम शेख
ख्वाजाबी कुरेशी
अनिता भोसले
नंदा कुलकर्णी
उषा ठाणगे

युतीला दोन पुरस्कृतांची साथ

शिवसेना-भाजपमधील अंतर्गत वादामुळे या निवडणुकीत ‘पुरस्कृत’चा नवा फंडा पुढे आला. त्यात चार अपक्षांचा फायदा झाला. एकमेकांना शह देण्यासाठी शिवसेना-भाजपने प्रत्येकी दोन अपक्षांना पुरस्कृत केले. पक्षाचे पाठबळ मिळाल्याने चारही पुरस्कृत अपक्ष निवडून आले. परंतु त्यापैकी नंदा कुलकर्णी व उषा ठाणगे यांनी ऐनवेळी पक्षाची साथ सोडली. दोघीही आघाडीच्या पंक्तीत जाऊन बसल्या. सचिन जाधव व सारिका भुतकर यांनी मात्र युतीला शेवटपर्यंत साथ दिली. त्यामुळे युतीचे संख्याबळ 28 झाले आहे.

आघाडीच्या नगरसेवकांची ‘आनंद ’ यात्रा

संख्याबळाची जुळवाजुळव झाल्यानंतर आघाडीने महापौर व उपमहापौरपदाच्या उमेदवारांची नावे जाहीर केली. परंतु ऐनवेळी काही गडबड होऊ नये, यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे सर्व नगरसेवकांना सक्तीच्या सहलीवर पाठवले होते. हे सर्व नगरसेवक थेट महापौर-उपमहापौरपदाची निवड प्रक्रिया सुरू होण्याच्या अवघे पंधरा मिनिटे अगोदर महापालिकेत हजर झाले. सर्वांना सुरक्षित पोहचता यावे, तसेच कोणतीही गडगबड होऊ नये, यासाठी जय आनंद ट्रॅव्हलची व्यवस्था करण्यात आली होती.