आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल बाळगणाऱ्या दोन जणांचे पेपर बाद, जिल्हा परिषद भरती परीक्षेतील प्रकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा परिषदेतील लेखा परिचर पदांसाठी झालेली रविवारी घेण्यात आलेली परीक्षा सुरळीत पार पडली. पेपर फुटल्याची अफवा होती, प्रत्यक्षात कुठेही गैरप्रकार झाला नाही. राधाबाई काळे महिला महाविद्यालयातील केंद्रात मोबाइल नेणाऱ्या दोघांचे पेपर रद्द करण्यात आले. परीक्षेची उत्तरपत्रिका सोमवारी (३० नोव्हेंबर) ऑनलाइन प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा परिषदेत विविध पदांसाठी भरती परीक्षा सुरू आहे. रविवारी लेखा विभागातील एका जागेसाठी १५४ अर्ज आले होते. परीक्षेला ११० जण उपस्थित होते. परिचरांच्या ३१ जागांसाठी १७ हजार ८९३ अर्ज आले. त्यातील १६ हजार १०० उमेदवारांनी शहरातील ९५, आणि नेवासे, श्रीरामपूर येथील प्रत्येकी एका केंद्रावर परीक्षा दिली. यापूर्वी झालेल्या परीक्षांची उत्तरपत्रिका ऑनलाइन प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर चार दिवस हरकती मागवल्या जाणार आहेत. बुधवारी (२ डिसेंबर) ग्रामसेवकांच्या ३३ जागांसाठी हजार ८००, तर स्थापत्य अभियांत्रिकीच्या एका जागेसाठी हजार ५८७ उमेदवार बसले आहेत, असे नवाल यांनी सांगितले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी उज्ज्वला बावके उपस्थित होत्या.

'टोल फ्री' वर तक्रारी
जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या टोल फ्री नंबरवर दोन महिन्यांत ५०० तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी जिल्हा परिषदेच्या अख्त्यारीतील ९० टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती सीइओ शैलेश नवाल यांनी दिली.