आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - एकाच वेळी दोन ठिकाणी शुक्रवारी दुपारी लागलेल्या आगीच्या घटनांत लाखो रुपयांचे नुकसान झाले. रेल्वेस्टेशनवरील मालधक्क्याच्या गोदामाला लागलेल्या आगीत साखरेच्या 200 पोत्यांचे नुकसान झाले. एमआयडीसीतील वर्धमान पॉलिफिल्म कंपनीत लागलेल्या आगीत केमिकलचे 15 बॅरल जळून खाक झाले. महापालिकेचे अग्निशमन पथक दोन्ही ठिकाणी वेळेत पोहोचल्याने मोठी हानी टळली.
काटवन खंडोबा येथील मंडप डेकोरेटर्सच्या गोदामाला दोन दिवसांपूर्वी लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच शुक्रवारी पुन्हा आगीच्या दोन घटना घडल्या. पश्चिम बंगालला पाठवण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने 50 किलोची 1 हजार 200 पोती रेल्वे मालधक्क्यावरील गोदामात ठेवली होती.
मालधक्क्यावरील ठेकेदार करीमभाई हुंडेकरी यांच्यामार्फत ही साखर रेल्वेने पाठवण्यात येणार होती. गोदामात अचानक आग लागून या साखरेचे मोठे नुकसान झाले. आग लागल्याचे समजताच मनपाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आग लगेच नियंत्रणात आली, परंतु पाण्यामुळे साखरेची पोती भिजली.
मालधक्क्यावरील आग नियंत्रणात येत नाही, तोच एमआयडीसीतील वर्धमान पॉलिफिल्म कंपनीत आग लागली. या दुर्घटनेत केमिकल असलेले 15 बॅरल जळून खाक झाले. त्यामुळे कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
उन्हाचा पारा चढल्याने आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आग शमवण्यासाठी असलेली मनपाची यंत्रणा तोकडी आहे. मनपाकडे सध्या केवळ चार बंब असून त्यातील एक गाडी कालबाह्य झालेली आहे.
पुनर्प्रक्रिया करणार
आगीत वृद्धेश्वर कारखान्याच्या 200 साखरपोत्यांचे नुकसान झाले. आग शमवण्यासाठी वापरण्यात आलेल्या पाण्यामुळे पोती भिजली आहेत. ही सर्व पोती कारखान्यात नेऊन त्यावर पुनप्र्रक्रिया करण्यात येणार आहे.’’ भास्कर गोरे, व्यवस्थापक, वृद्धेश्वर कारखाना
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.