आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनैश्वर देवस्थानात प्रथमच महिला विश्वस्त; 400 वर्षांनंतर सामाजिक बदल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानच्या इतिहासात प्रथमच अनिता शेटे आणि शालिनी लांडे या दोन महिलांचा समावेश विश्वस्त मंडळात करण्यात आला आहे. ज्या मंदिरात एका महिलेने शनीदेवाच्या चौथऱ्यावरजाऊन दर्शन घेण्यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला होता, मंदिराचे शुद्धीकरण करण्यात आले होते त्याच मंदिराच्या ४०० वर्षांच्या इतिहासात प्रथमच ११ जणांच्या विश्वस्त मंडळात दोन महिलांना विश्वस्तपदाची संधी मिळाली आहे. हा एक मोठा सामाजिक बदल आहे.

सहायक धर्मादाय आयुक्त बी. टी. येंगडे यांनी बुधवारी मंदिराच्या ११ विश्वस्तांच्या नावाची घोषणा केली. त्यात अनिता शेटे आणि शालिनी लांडे यांचाही समावेश आहे. त्यांच्या नावाची घोषणा होताच महिलांनी हा आपला मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
शनैश्वर देवस्थान नोव्हेंबर महिन्यापासून चर्चेत आहे. चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाचे दर्शन घेण्यास बंदी असताना एका युवतीने चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतल्याने वाद झाला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन घटनेचा निषेध केला होता तसेच शनिदेवाला अभिषेक केला होता. त्यावर राज्यभरातून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या. सामाजिक कार्यकर्ते आणि महिलांनी ग्रामस्थांच्या कृतीचा निषेध केला होता. त्यानंतर पुण्यातील काही महिलांनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न केला होता. सुरक्षा रक्षकांनी अडवल्यानंतर या महिलांनी पोलिसांत तक्रारही केली होती. या घटना घडत असतानाच विश्वस्त मंडळाची मुदत संपली. त्याच वेळी विश्वस्तपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय काही महिलांनी घेतला. विश्वस्त पदासाठी ९७ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यात १० महिलाही होत्या. नंतर या महिलांची मुलाखत घेण्यात आली.त्यातून अनिता शेटे आणि शालिनी लांडे यांची निवड झाली.

नवनियुक्त विश्वस्त मंडळ : अनिताचंद्रहंस शेटे, शालिनी राजू लांडे, बापूसाहेब शंकर शेटे, डॉ. रावसाहेब सुखदेव बानकर, योगेश कचरू बानकर, डॉ. वैभव सुखदेव शेटे, दीपक बाबासाहेब दरंदले, अप्पासाहेब ज्ञानदेव शेटे, भागवत सोपान बानकर.

४०० महिला वाहणार तेल
भूमातारणरागिणी ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सांगितले की, संघटनेच्या ४०० महिला २६ जानेवारीला परंपरा मोडून शनिदेवाला तेल वाहतील आणि पूजा करतील. २१ व्या शतकात आम्ही हा भेदभाव सहन करू शकत नाही.