आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ucchada Expressed A Thief In The City People In Agony

शहरात मांडला चोरांनी उच्‍छाद - नागरीकामध्‍ये संताप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी शहरात उच्छाद मांडल्याचे ‘दिव्य मराठी’ने शुक्रवारी मांडले होते. गुरुवारच्या (23 जानेवारी) घटनेनंतर सलग दुसर्‍या दिवशीही ‘धूम स्टाइल’ चोरट्यांनी त्यांचा उच्छाद सुरू ठेवला. शुक्रवारी दागिने हिसकावण्याच्या दोन घटना घडल्या. यातून पोलिसांची निष्क्रियता स्पष्टपणे अधोरेखित होत आहे.
तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत ‘धूम स्टाइल’ने महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. गुरुवारी पुण्याहून आलेल्या पाहुण्या महिलेच्या गळ्यातील चार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी लांबवले. पुष्पा शंकर आल्हे असे त्यांचे नाव असून घटनेनंतर मदतीसाठी धावलेल्या महिलांना खिजवत या चोरट्यांनी पोबारा केला. सातत्याने घडणार्‍या घटनांमुळे उपनगरामध्ये फिरणेही महिलांसाठी मुश्किल झाले आहे. गुरुवारच्या घटनेची शुक्रवारी पुनरावृत्ती करत चोरट्यांनी पोलिसांची निष्क्रियता आणखी स्पष्ट केली आहे.
योगायोगाने शुक्रवारीही पुण्याहून आलेल्या पाहुण्या महिलेचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावले. सुरेखा हेमंत महातेकर (40, प्रसाद पार्क, विठ्ठलवाडी, पुणे) या लग्न समारंभासाठी आल्या होत्या. पाइपलाइन रस्ता परिसरातील निर्मलनगरनजीकच्या गंगा लॉन येथील लग्न आटोपल्यानंतर पाहुण्यांकडे ठेवलेली बॅग आणण्यासाठी त्या सासूसमवेत निघाल्या. लॉनपासून थोडेसे अंतर पुढे गेल्यानंतर मोटारसायकलवरून आलेल्या दोनपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. गोंधळलेल्या महातेकर व त्यांच्या सासू भानावर येईपर्यंत चोरट्यांनी पोबारा केला. शुक्रवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास ही घटना घडली. आकाशी रंगाच्या मोटारसायकलवरून चोरटे आल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. मात्र, त्यांना या मोटारसायकलचा क्रमांक सांगता आला नाही.
या घटनेनंतर पंधरा मिनिटांनी मंगळसूत्र हिसकावण्याची दुसरी घटना कल्याण रस्त्यावरील नेप्ती चौकात घडली. सुरेखा सुरेश लोंढे (कान्हूरपठार, ता. पारनेर) या त्यांची नणंद हेमा माळी यांच्यासमवेत नेप्ती चौकात थांबल्या होत्या. गावाकडे जाण्यासाठी दोघीही बसमध्ये चढत असतानाच एका महिलेने त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. गर्दीचा फायदा घेऊन ही महिला पळून जाण्यात यशस्वी झाली. काही रिक्षाचालकांनी या महिलेला बघितले आहे. त्यांच्याकडून या महिलेबाबत पोलिसांना माहिती मिळाली आहे.
तपास बनला आव्हान
दागिने हिसकावणार्‍या नवनवीन टोळ्या सक्रिय होत आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर या गुन्ह्यांचा तपास करण्याचे मोठे आव्हान आहे. यापूर्वी पकडलेले काही चोरटे अल्पवयीन व सुखवस्तू घरातील असल्याचे आढळले. मौजमजा करण्यासाठी दागिने हिसकावल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे. त्यामुळे तपासावर असलेल्या अशा गुन्ह्याचे प्रमाण अधिक आहे.
नवीन घर फोडले
वास्तूशांती करून कुलूपबंद केलेले घर चोरट्यांनी फोडल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. वसंतराव विश्वास शिंदे यांच्या नवीन घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दहा हजार रुपयांचा ऐवज लांबवला. पाइपलाइन परिसरातील ऐक्यनगर येथे धाडसी घरफोडी करत चोरट्यांनी 65 हजारांचा ऐवज गुरुवारी लांबवला होता. घरफोडीचे गुन्हेही सातत्याने घडत आहेत.
नागरिकांनी सहकार्य करण्याची आवश्यकता
आपापल्या परिसरात विनाक्रमांक व फॅन्सी क्रमाकांच्या मोटारसायकलवर संशयित दिसल्यास तातडीने नियंत्रण कक्ष अथवा 8698691919 या क्रमांकावर संपर्क करावा. माहिती देणार्‍यांची विचारपूस केली जाणार नाही. या माहितीला तातडीने प्रतिसाद दिला जाईल. नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे किमान अशा घटना रोखता येऊ शकतील. परिसरात न राहणार्‍या अशा व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी विनासंकोच संपर्क करावा, असे आवाहन नागरिकांना पोलिस उपाधीक्षक श्याम घुगे यांनी ‘दिव्य मराठी’ शी बोलताना केले.