आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विखे पिता-पुत्र खाल्ल्या मिठाला जागले नाहीत - उद्धव ठाकरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर - काँग्रेसमध्ये अडगळीत पडलेल्या विखे पिता-पुत्रांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मंत्रिपद देऊन प्रतिष्ठा मिळवून दिली. मात्र, दोघेही खाल्ल्या मिठाला जागले नाहीत. आज तेच शिवसैनिकांना झोडपण्याची भाषा करत आहेत. ते अंगावर आल्यास शिवसैनिक त्यांना ठेचल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा देतानाच शिर्डी मतदारसंघात विखेंची शक्ती नाही, तर साईबाबांची भक्ती चालणार आहे, असे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी रात्री आयोजित सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी आमदार अशोक काळे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, खासदार राजकुमार धूत, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे व शशिकांत गाडे, बबनराव घोलप, शिवाजी ढवळे, सदाशिव लोखंडे आदी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, विखे यांना शिवसेनेने सन्मान दिला. मात्र, ते आज शिवसैनिकांनाच दम देत आहेत. शिवसैनिक त्यांना जशास तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत. विखे व त्यांच्या बगलबच्च्यांनी दीड ते दोन लाख सभासद असणार्‍या मुळा-प्रवरा सहकारी वीज संस्थेचे वाटोळे केले. सोळाशे कामगारांना बेरोजगार केले. आमची सत्ता आल्यावर त्यांचा प्रश्न आधी सोडवला जाईल. राधाकृष्ण विखे कृषिमंत्री आहेत. मात्र, त्यांच्याच जिल्ह्यात कोट्यवधींचे नुकसान गारपिटीत होऊनही अवघ्या काही लाखांची मदत देऊन शासनाने शेतकर्‍यांची घोर चेष्टा केली. शेतकर्‍यांच्या पाण्याचा प्रश्न इतके वर्षे मंत्री असूनही त्यांना सोडवता आला नाही.

केवळ दोन जिल्ह्यांतील शेतकर्‍यांमध्ये भांडणे लावण्याचे काम त्यांनी केले. युतीची सत्ता येताच नगर जिल्ह्यातील पाणीप्रश्न आधी सोडवला जाईल, असे ठाकरे म्हणाले.

काँग्रेसची मानसिकता जातीयवादी
घोलप यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करून खटले चालवले जातात. मात्र, खून, भ्रष्टाचाराचे गुन्हे करणार्‍यांना आघाडीकडून उमेदवारी दिली जाते. अशोक चव्हाणांवर खटला का चालवत नाही, असा सवाल ठाकरे यांनी केला. पृथ्वीराज चव्हाण यांनी अद्याप दिल्लीतील बंगला रिकामा केला नाही. दलितांचे नेते खासदार रामदास आठवले यांचे बिर्‍हाड मात्र रस्त्यावर टाकले जाते. यातूनच काँग्रेसची जातीयवादी मानसिकता दिसून येते. शिवसेनेवर जातीयवादाचा आरोप करणार्‍या सोनिया गांधी यांनी निवडणुकीस जातीय रंग दिला, असा आरोपही ठाकरे यांनी केला.