आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१६ धार्मिक स्थळांचे पुरावे मनपा प्रशासनाला सादर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत महापालिकेत मंगळवारी सुनावणी झाली. या सुनावणीत २४ पैकी १६ मंदिरांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनासमोर पुरावे सादर केले. एका पदाधिकाऱ्याने पुरावे सादर करण्यासाठी मुदत मागितली. सुनावणीचा सर्व अहवाल बुधवारी समितीसमोर ठेवण्यात येणार असून त्यानंतरच या मंदिरांबाबत अंतिम निर्णय होणार आहे. दरम्यान, धार्मिक स्थळांच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी तातडीने विशेष महासभा बोलवा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचा तिढा वाढला आहे. शहरातील एकही मंदिर पाडू नये, यासाठी सर्वच पक्षांचा प्रशासनावर दबाव आहे. यासंदर्भात आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महापालिका प्रशासनाच्या विरोधात मोर्चाही काढण्यात आला होता. महापौर सुरेखा कदम यांनीही याप्रश्नी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. प्रशासनाने सर्वेक्षण करून अनधिकृत ठरवलेली मंदिरे नियमित करा, वेळप्रसंगी त्यासाठी महासभेत ठराव करू, अशा सूचना महापौरांनी प्रशासनाला दिल्या होत्या. दरम्यान, सर्वच पक्षांनी प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणाबाबत आक्षेप घेतला. त्यानंतर प्रशासनाने धार्मिक स्थळांचे फेर सर्व्हेक्षण केले. शहरातील एकूण ५७४ धार्मिक स्थळे अनधिकृत ठरवण्यात आली आहेत. त्यात विविध भागातील रस्त्यांवर १०५, तर सार्वजनिक ठिकाणी २६५ धार्मिक स्थळे आहेत. सुरूवातीच्या टप्प्यात २६ मंदिरांना नोटिसा बजावण्यात आल्या. पैकी सहा मंदिरे पाडण्याची तयारी प्रशासनाने केली. परंतु पुरावे सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याने ही कारवाई थांबवण्यात आली होती. सहापैकी दोन मंदिरांच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच पुरावे सादर केले. मंगळवारी झालेल्या सुनावणीत २४ पैकी १७ मंिदरांच्या पदाधिकाऱ्यांची सुनावणी घेण्यात आली. त्यात १६ पदाधिकाऱ्यांनी मंदिरांचे पुरावे प्रशासनासमोर सादर केले. एका मंदिराच्या पदाधिकाऱ्याने पुरावे सादर करण्यासाठी मुदतवाढ मागितली.

सुनावणीचा अहवाल बुधवारी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. पदाधिकाऱ्यांनी सादर केलेले मंदिराचे पुरावेदेखील समितीसमोर ठेवण्यात येतील. त्यानंतरच या मंदिरांबाबत निर्णय होणार असल्याचे नगररचना अधिकारी राजेश पाटील यांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना स्पष्ट केले.

तातडीने विशेष महासभा बोलवा
महापालिकाप्रशासनाने धार्मिक स्थळांचे चुकीच्या पध्दतीने सर्वेक्षण केले. प्रशासनाने कोणत्या मंदिरांचे सर्वेक्षण केले, कोणती मंदिरे अनधिकृत ठरवली, याबाबत नागरिकांसह नगरसेवकांनाही काहीच माहिती नाही. त्यामुळे शहरातील या धार्मिक स्थळांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी तातडीने विशेष महासभा बोलवा, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांच्यासह विरोधकांनी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...