आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील अनधिकृत रिक्षा चालकांवर गुन्हे नोंदवा, कारवाईसाठी मनपानेही दिले वाहतूक पोलिसांना पत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहर बससेवा (एएमटी) सुरू होऊन एक महिना उलटला. या कालावधीत अनधिकृत रिक्षा चालकांमुळे एएमटीला अनेक अडचणींना तोड द्यावे लागले. त्यामुळे महापालिका, जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाने अनधिकृत रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई अथवा गुन्हे दाखल करावेत, तरच एएमटीची सेवा देणे सोयीस्कर होईल, अशी मागणी अभिकर्ता संस्था यशवंत ऑटोचे संचालक धनंजय गाडे यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना शुक्रवारी केली.
शहरात महिनाभरापूर्वी एएमटी पुन्हा सुरू झाली. विद्यार्थी, पालक, नोकरदार, ज्येष्ठ नागरिकांसह संपूर्ण शहर व उपनगरांनी या सवेचे स्वागत केले. प्रवाशांना अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन व अभिकर्ता संस्था करत आहे. सर्व प्रवाशांचा प्रत्येकी एक लाख रुपयांचा विमा, विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, त्यासाठी त्यांना हव्या त्या वेळेत बससेवा उपलब्ध करून देणे, सवलतीच्या दरात पासेस देणे, पर्यटनप्रेमींसाठी नगरदर्शन उपक्रम अशा सुविधा एएमटीमार्फत देण्यात येणार आहेत. महिनाभरात प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळाला अाहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत आणखी सहा बस सुरू करण्यात येणार असल्याचे गाडे यांनी सांगितले. शहरातील अनधिकृत रिक्षाचालकांडून प्रवाशांची अर्थिक लूट सुरू आहे. असे असतानाही अनधिकृत रिक्षा चालकांवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे महापालिका, जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाने पुण्याच्या धर्तीवर अनधिकृत रिक्षा चालकांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, तरच नगरकरांना चांगली सेवा देता येईल, अशी मागणी गाडे यांनी केली.

दोन दिवसांत पत्र देणार
बससेवा सुरू होऊन एक महिला पूर्ण झाला आहे. या कालावधीत प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. दिवसेंदिवस एएमटीच्या प्रवाशांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे दोन शिफ्टमध्ये काम सुरू करून दोन तास वेळ वाढवला आहे. अनधिकृत रिक्षा चालकांमुळे सेवा पुरवण्यात अनेक अडचणी येतात. या रिक्षा चालकांवर गुुन्हे दाखल करावेत, असे पत्र येत्या दोन दिवसांत जिल्हा प्रशासन व पोलिसांना देणार आहे.'' धनंजय गाडे, संचालक, यशवंत ऑटो अभिकर्ता संस्था
रात्री साडेनऊ वाजेपर्यंत शहर बससेवा सुरु ठेवा
शहरात सध्या दहा बस सुरू आहेत, त्यांच्या मार्फत दिवसभरात १२६ फेऱ्या पूर्ण केल्या जातात. विद्यार्थी, नोकरदार, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी बससेवा अधिक फायद्याची ठरत आहे. एमआयडीसीतील कामगारांसाठी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत बससेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. विद्याथ्यांना पास देण्यासाठी संबंधित शाळा - महाविद्यालयांशी चर्चा सुरू आहे. विद्याथ्यांना लवकरच पासेस दिले जाणार असल्याचे गाडे यांनी सांगितले.