नगर-शहरासह उपनगरांच्या दृष्टीने महत्त्वाच्या 266 कोटींच्या महत्त्वाकांक्षी भुयारी गटार योजनेला अखेर केंद्र शासनाच्या शहरी विकास मंत्रालयाने मंजुरी दिली. त्यासाठी महापौर संग्राम जगताप यांनी मंगळवारी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. पवार यांनी शहरी विकास मंत्रालयाशी संपर्क साधून योजनेच्या मंजुरीबाबत चर्चा केली. शहर विकास मंत्रालयाने योजनेला मंजुरी देऊन 106 कोटींच्या पहिल्या हप्त्याचा निधी राज्य शासनाकडे वर्ग केला.
शहराचा विस्तार मोठय़ा प्रमाणात झाला असला, तरी सांडपाणी विल्हेवाटीचा प्रश्न अनेक वर्षांपासून ‘जैसे थे’ आहे. शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सीनानदीत सोडण्यात येते. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला असून त्यासाठी शहरात भुयारी गटार योजना राबवणे गरजेचे होते. महापालिका प्रशासनाने तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. केंद्राची मंजुरी चार-पाच महिन्यांपासून रखडली होती. महापौर जगताप यांनी मंजुरीसाठी प्रयत्न केले. यंत्र अभियंता परिमल निकम यांना घेऊन त्यांनी कृषिमंत्री पवार यांची भेट घेतली. पवार यांच्या सांगण्यानुसार त्यांनी थेट दिल्ली गाठली. पवार यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे 266 कोटींच्या योजनेला मंजुरी मिळाली.
आचारसंहितेमुळे ही मंजुरी आणखी काही महिने रखडली असती, परंतु महापौर जगताप यांच्या प्रयत्नाने योजनेला मंजुरी मिळाली. सुरुवातीला ही योजना केवळ सावेडीसाठीच होती. केडगावसाठी स्वतंत्र प्रस्ताव पाठवण्यात आला होता. नंतर त्यात बदल करून संपूर्ण शहरासाठी एकच सुधारित प्रस्ताव पाठवण्यात आला. पहिल्या हप्त्याचे 106 कोटी राज्य शासनाकडे वर्ग करण्यात आल्यामुळे या कामाचा पुढील मार्ग मोकळा झाला आहे.