नगर- राष्ट्रवादी काँग्रेसने भ्रष्टाचाराचे राजकारण केले, तर शिवसेनेने धमक्यांचे राजकारण केले. राजकारणात विनम्रता, शालिनता, तसेच शब्दांवर नियंत्रण आवश्यक असते. आमच्या मनात युती तोडण्याचे नव्हते. तसे असते तर अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातून जसे बुटासिंग यांना हटवले, तसे शिवसेनेचे मंत्री अनंत गिते यांनाही आम्हाला हटवता आले असते. तथापि, आमच्या मनात वाईट हेतू नव्हता, असे केंद्रीय नदीविकास मंत्री उमा भारती म्हणाल्या.
नगर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अभय आगरकर यांच्या प्रचारार्थ रविवारी आम्रपाली गार्डनमध्ये आयोजित जाहीर सभेत उमा भारती बोलत होत्या. खासदार दिलीप गांधी, उमेदवार अभय आगरकर, ज्येष्ठ नेते मधुसूदन मुळे, सुनील रामदासी, शहर भाजपचे उपाध्यक्ष अनिल गट्टाणी, महिला आघाडीच्या पदाधिकारी गीता गिल्डा, दामोदर बठेजा, संगीता खरमाळे, शिवाजी लोंढे आदी या वेळी उपस्थित होते.
उमा भारती म्हणाल्या, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी एक चांगल्या राजकीय संस्कृतीला देशात सुरुवात केली आहे. यापूर्वी असलेल्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केलेले भाषण हे लेखी स्वरूपाचे असे. मात्र, मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी केलेल्या भाषणात देशातील जनतेबरोबर संवाद साधला. योजनांसाठी खूप पैसा आहे. मात्र, नियोजन आयोग दिल्लीत बसून बैठका घेतो. पैसा असताना शिक्षण, सिंचन, रोजगार यांची कामे होऊ शकली नाहीत. नियोजन आयोग दिल्लीत बैठक घेऊन नियोजन करतो, मात्र या नियोजनाचे लोणी दुसरेच खातात. आदर्श घोटाळा, टेलिकॉम घोटाळा यावर यापूर्वीचे पंतप्रधान गप्प असायचे. आता मात्र पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचार करणार नाही व कुणाला करू देणार नाही, अशी कठोर भूमिका घेतली आहे.
अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यावेळी नदीजोड प्रकल्प राबवण्याचे निश्चित करण्यात आले होते. देशात असे 30 प्रकल्प राबवण्यात येणार होते. नदीजोड प्रकल्प पर्यावरणाच्या विरोधात नव्हता. नद्यांना येणारा पूर लक्षात घेऊनच हा प्रकल्प राबवण्यात येणार होता. पर्यावरण नियमांचे उल्लंघन होऊ नये, नद्यांतील पाणी कमी होऊ नये, तसेच पिण्यायोग्य पाणी हे समुद्रात वाया जाऊ नये याची काळजी घेण्यात येणार होती, असे उमा भारती यांनी सांगितले.
नदी विकासाचा विभाग माझ्याकडे आल्यानंतर या विभागाच्या प्रमुखांना 75 टक्के अपूर्ण राहिलेले प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच अन्य प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी वेळ निश्चित करावा, असे सांगितले असे उमा भारती म्हणाल्या.
नदीजोड प्रकल्पात तापी नदीबरोबरच नगर जिल्ह्यातील मुळा व प्रवरा नदीचा समावेश करावा, असे मी सांगितले आहे. महाराष्ट्रात सिंचनाचे मोठे काम झाले आहे. राज्याच्या परवानगीिशवाय कुठलाही प्रकल्प हाती घेणार नाही. नदीजोड प्रकल्पातून नदी मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. कानपूर, कोलकाता, पाटणा येथील गंगा नदीतील पाणी जनावरेही पिऊ शकणार नाहीत, इतके अस्वच्छ आहे. तीन वर्षात गंगा नदी स्वच्छ करणार येणार असून देशातील अन्य नद्याही स्वच्छ करण्यात येतील, असे त्या म्हणाल्या. जे प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण होणार होते, ते दहा-दहा वर्षे होऊनही झाले नाहीत. सर्व खेड्यांत पाणी पोहोचवण्याचा माझा संकल्प आहे. जेवढे रस्ते तेवढे िसंचन प्रकल्प राबवण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रात भाजपचे सरकार पूर्ण बहुमताने बनेल, असा विश्वास उमा भारती यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात आधी भाजप शिवसेनेबरोबर निवडणूक लढवत होता. बाळासाहेब ठाकरे हे माझ्यासाठी पितासमान होते. ते केवळ उद्धव यांचे पिता नव्हते, ते माझेही पिता होते. मी ज्यावेळी मुंबईला जात असे, त्यावेळी त्यांना भेटायचे. आता स्थिती वेगळी आहे, असे उमा भारती म्हणाल्या. या वेळी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष डुकरे यांनी उमाभारती यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
सीनेसाठी 300 कोटी द्या
नगर जिल्ह्यात दोन मोठी धरणे आहेत. आता आणखी दोन धरणे झाली आहेत.चार धरणांत साठून उरलेले पावसाचे 80-82 टीएमसी पाणी समुद्रात जाते. हे वाया जाणारे पाणी जर वळवले, तर नगर जिल्ह्यातील शेतीला पाणी मिळेल. त्याचा फायदा शेतक-यांना होईल. पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटेल. औरंगाबाद, नांदेड, जालना व परभणी हे जिल्हे सिंचनाखाली येतील. जिल्ह्यात अपूर्ण राहिलेल्या धरणांसाठी केंद्रातून निधी मिळावा.सीना नदी नगर शहरातून जात असल्याने नदीच्या सुशोभीकरणासाठी २०० -३०० कोटींचा निधी द्यावा.'' दिलीप गांधी, खासदार.