आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री जन्माचे स्वागत करून ‘त्याने’साजरा केला वाढदिवस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - विद्यार्थ्याचा वाढदिवस म्हटले की आई-बाबांकडे नव्या कपड्यांचा व खेळणीचा हट्ट धरणे ही सर्वसाधारणपणे परंपरा आहे. मात्र, इयत्ता सहावीतील मयूर सुधीर साठे या विद्यार्थ्याने आपल्या आई-वडिलांकडे वेगळाच हट्ट धरला व तो पूर्णत्वासही नेला. मयूरने ‘स्त्री जन्माचे स्वागत’ करून आपला वाढदिवस आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला.

मयूर साठे हा सावेडीतील समर्थ विद्या मंदिर प्रशालेचा विद्यार्थी आहे. वाढदिवस जवळ आला तसा त्याने आई-वडिलांकडे वेगळाच हट्ट धरला. नवीन कपडे किंवा केक न कापता त्याने वाढदिवस साजरा करणार असल्याचे पालकांना सांगितले. त्याचा हट्ट म्हणून पालकांनी डॉ. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात जाऊन नवजात मुलींना व त्यांच्या मातांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला.

या आगळ्या-वेगळ्या वाढदिवसाला स्त्री जन्माचे स्वागत करा, या चळवळीच्या प्रणेत्या डॉ. सुधा कांकरियादेखील उपस्थित होत्या. त्यांनीही मयुरच्या बालहट्टाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, स्वत:च्या वाढदिवस या मुलाने इथे जन्मलेल्या बारा मुलींना आपली बहीण मानून त्यांना सन्मान केला. हा उपक्रम कौतुकास्पद आहे. रुग्णालयातील कर्मचारी व बालिकांच्या मातांनीही मयूरचे कौतुक केले. या वेळी आशा साठे, प्रिया सोनटक्के, हिरा खताळ, लोकिता साठे, गुणप्रिया साठे आदी महिला उपस्थित होत्या. आपल्या आईने रक्षाबंधननिमित्त लष्करी जवानांना राख्या बांधून सण साजरा केला होता. आई आशा साठे यांच्यापासून प्रेरित होऊन सामाजिक दातृत्वाच्या भावनेतून हा उपक्रम राबवला, असे मयूरने या वेळी सांगितले.

असा मुलगा घरोघरी असावा
इतक्या लहान वयात सामाजिक जाणिवेतून मयूरने आगळावेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. नवजात बालिकांना आपली बहीण मानून त्याने समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे. समाजातील प्रत्येक मुलीला जर असा दादा मिळाला, तर स्त्री जन्माचे खरे स्वागत होईल. शिवाय स्त्री जन्मदराचे प्रमाणही वाढीला लागेल.’’ - डॉ. सुधा कांकरिया, नेत्रतज्ज्ञ.