आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी पावसाने रस्त्यांची दाणादाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कावीळ व डेंग्यूची साथ आटोक्यात येत नाही, तोच शहराला शुक्रवारी (१४ नोव्हेंबर) अवकाळी पावसाने झोडपले. पावसामुळे रस्त्यांची दाणादाण, तर उडालीच शिवाय जागोजागी पाण्याचे डबके साचल्याने साथीचे आजार पुन्हा एकदा डोके वर काढणार की काय? अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

नगरोत्थान अभियानांतर्गत सुरू असलेल्या बालिकाश्रम व कोठी रस्त्याची शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे दाणादाण उडाली. दोन्ही रस्त्यांवर जागोजागी खोदकाम करण्यात आले असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे दोन्ही रस्त्यांवरून सध्या पायी चालणेदेखील कठीण झाले आहे. शहरातील इतर रस्त्यांची देखील मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. गणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रमुख रस्त्यांच्या डागडुजीवर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, अवकाळी पावसामुळे या रस्त्यांवरील डांबर पुन्हा एकदा वाहून गेले आहे. महापालिकेने सवयीप्रमाणे या कामाच्या दर्जाकडे लक्ष न दिल्याने ही परिस्थती निर्माण झाली आहे. ठेकेदारांनी खड्डे बुजवताना तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष केले. खड्डे बुजवण्यासाठी सिमेंट, डांबर, खडीचा वापर न करता, विटा, दगड व मातीचा वापर केला. त्यामुळे सर्वच रस्त्यांवरील खड्डे पावसामुळे उघडे पडले आहेत.

अवकाळी पावसामुळे केवळ रस्त्यांचीच वाट लागली नाही, तर आरोग्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. दोन महिन्यांपूर्वीच दूषित पाणीपुरवठ्यामुळे सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक नागरिकांना काविळीच्या आजाराला तोंड द्यावे लागले. त्यात दोन जणांचा मृत्यूदेखील झाला. कावीळ आटोक्यात येत नाही, तोच शहरात डेंग्यूची साथ पसरली. आता जागोजागी अवकाळी पावसाचे पाणी साचल्याने काविळीसह डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. टाइफाॅईड, मलेरियाचे आजारही झपाट्याने वाढणार आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे असतानाही महापालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाने कोणत्याच उपाययोजना केल्या नाहीत. साचलेले पाणी पिण्याच्या पाइपलाइनमध्ये उतरले, तर नागरिकांना पुन्हा एकदा दूषित पाणीपुरवठ्यास तोंड द्यावे लागणार आहे. पाण्याच्या वितरण व्यवस्थेला जागोजागी गळती लागली आहे. अनेक पाइपलाइन ओढे-नाल्यांमधून गेलेल्या आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी पिण्याच्या पाइपलाइनमध्ये उतरणार नाही, यासाठी मनपाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे येत्या काही काळात शहरात पुन्हा कावीळ व डेंग्यूची साथ पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पैशांची उधळपट्टी
शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांच्या डागडुजीसाठी महापालिका दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. मात्र, त्यातून केवळ अधिकारी व ठेकेदारांचे भले होते. पॅचिंगच्या नावावर वारंवार खर्च होत असला, तरी रस्त्यांवरील खड्ड्यांची संख्या कमी होण्याऐवजी ती दविसेंदविस वाढत आहे. शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे हा भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

दूषित पाण्याची भीती
शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जागोजागी पावसाच्या पाण्याचे तळे साचले आहेत. या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी मनपाकडे आवश्यक ती यंत्रणा नाही. साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढणार आहे. परिणामी पुन्हा साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागणार असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, रस्‍त्‍यांची झालेली दुर्दशा