आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझे हात-पाय चालेपर्यंत नगरकरांची रूग्णसेवा चालूच ठेवणार...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-जोपर्यंत माझे हात-पाय चालत आहेत आणि रूग्णांचा माझ्यावर विश्वास आहे, तोपर्यंत रूग्णसेवेचं व्रत मी चालूच ठेवणार आहे... हे सांगत होते पंचाहत्तरीतही निवृत्तीचा विचार मनाला शिवलेले, प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. जयंत निसळ. 
डॉ. निसळ यांचा अमृत महोत्सव रविवारी (१५ एप्रिल) सायंताळी वाजता सावेडीतील माउली सभागृहात साजरा होत आहे. यानिमित्त ‘दिव्य मराठी’शी संवाद साधताना डॉ. निसळ यांनी जीवनप्रवास उलगडला. आमचं घराणं मूळचं खुल्दाबादचं. अल्लाउद्दीन खिलजीच्या स्वारीनंतर आमचे पूर्वज मांडवगणला स्थायिक झाले. आजोबा वारकरी पंथाचे होते, तर माझ्या वडिलांना मल्लखांब, कुस्तीची आवड. मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेऊन १९३७ मध्ये त्यांनी भिंगारला गोरगरिबांसाठी दवाखाना सुरू केला. भिंगारमधील ते पहिले डॉक्टर. नगरमध्ये नवीपेठेत, तसंच सिटी लाईन भागातही त्यांचा दवाखाना होता. सायकलवर ते फिरत, भिंगारला टांग्यानं जात. 
अहमदनगर कॉलेजमध्ये इंटर सायन्स केल्यानंतर मी पुण्याच्या बीजे मेडिकलला गेलो. जब्बार पटेल, अनिल अवचट, पद्मसिंह पाटील, मोहन आगाशे, जयंत करंदीकर तेव्हा बीजेला होते. एमडी करताना रूबी हॉलमध्ये डॉ. ग्रँट, डॉ. वाडिया यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. १९७४ ला नगरला परत आलो. तेव्हा इथं डॉक्टरांची संख्या खूप कमी होती. डॉ. केतकर, डॉ. गुणे, डॉ. नाडगौडा असे सर्जन होते. आम्ही सातजण फिजिशियन होतो. सकाळी ते रात्री अशी १२ तास रूग्णसेवा करायचो. प्रारंभी आयुर्वेदमध्ये सेवा दिली. १९८२ मध्ये स्वत:च हॉस्पिटल सुरू केलं. मागील साडेचार दशकं नगरकरांची रूग्णसेवा करतो आहे. 
 
नगर ही संतांची भूमी. माझं भाग्य असं की, यातील काहींना याची देही याची डोळा पाहण्याची संधी मिळाली. संतकवी दासगणू महाराज आमच्या कोर्टगल्लीतच रहात. वाड्याच्या ओट्यावर ते येऊन बसत. अवतार मेहेरबाबांना मी पाहिलं. राष्ट्रसंत आनंदऋषी महाराज, श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराजांशी संबंध आला. क्षीरसागर महाराजांच्या तर अखेरच्या क्षणी मी त्यांच्याजवळ होतो, असे ते म्हणाले. 
 
डॉ. निसळ यांच्या वडिलांनी नगरच्या राजकारणावर आपली छाप उमटवली. डॉ. सतीश मात्र राजकारणापासून दूर राहिले. निवडणूक लढवण्याचा मलाही आग्रह झाला. बँकांच्या निवडणुकांच्या वेळीही बोलवणे येई. राजकारणात गेलं, की पेशंटकडे तेवढं लक्ष देता येणार नाही, म्हणून मी ते निग्रहानं टाळलं, असे ते म्हणाले. वडिलांमुळे अनेक राजकारण्यांचा आमच्या घरी राबता असे. शरद पवार, वसंतराव नाईक येऊन गेले. जिल्ह्यातील निंबाळकर, घुले, हराळ अशी अनेक मंडळी पेशंट म्हणूनही येत. आले की ओपीडीमध्ये बसत. मोठेपणा कधी मिरवला नाही, अशी आठवण डॉ. निसळ यांनी सांगितली. 
 
मला प्रवासाची आवड. कार ड्राईव्ह करत जवळजवळ सगळा भारत पाहिला. युरोपही बघितला. वयाच्या दहाव्या वर्षी हातात कॅमेरा आला. वाड्यातील बळदात मी डार्करूमही तयार केली होती, असं डॉक्टरांनी सांगितलं. 
 
एमडीनंतर पुढं शिकायची इच्छा होती. सुपर स्पेशालिटी करता आली नाही, याची खंत कधी कधी वाटते. पुण्यातली दहा वर्षे सोडली, तर आयुष्य नगरमध्ये गेलं. नगर मला अजूनही आवडतं, पण ते सुधारलेलं असावं, असं वाटतं. मी लहान असताना शहरात रोज सकाळी आणि संध्याकाळी नळाला पाणी येत असे. रस्त्यांवर पाणी मारलं जाई. सार्वजनिक स्वच्छता, पुरेसं शुद्ध पाणी, नियमित वीजपुरवठा या सुविधा नगरकरांना मिळायला हव्यात, अशी इच्छा डॉ. निसळ यांनी व्यक्त केली. 
 
विसंवाद नको, विश्वास हवा... 
पूर्वी रूग्णांचा डॉक्टरांवर विश्वास असे. कुठलाही रोग असो, तो बरा व्हायला काही काळ लागतो. पण आता लोकांना असे वाटते ताप आला, तर लगेच बरा व्हायला हवा. सकाळी एका डॉक्टरला, तर संध्याकाळी दुसऱ्या डॉक्टरकडे ते जातात. कम्युनिकेशन गॅपमुळे काही वेळा विसंवादाच्या घटना घडतात. डॉक्टर हा काही देव नसतो. प्रत्येकवेळी तो रूग्णाचे प्राण नाही वाचवू शकत. तसं असतं, तर सगळेच शंभर वर्षे जगले असते, असं डॉ. जयंत निसळ म्हणाले. 
 
बातम्या आणखी आहेत...