आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा खासदार दिलीप गांधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर अर्बन मल्टिस्टेट को- ऑप बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा खासदार दिलीप गांधी यांची वर्णी लागली. नवनिर्वाचित संचालक मंडळ व सर्वसभासदांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी हा निर्णय घेण्यात आला. उपाध्यक्षपदी राधावल्लभ कासट यांची निवड करण्यात आली. सत्ताधारी सहकार पॅनेलने खासदार गांधी व ज्येष्ठ संचालक सुवालाल गुंदेचा यांच्या नेतृत्वाखाली सर्वच्या सर्व १८ जागांवर दणदणीत विजय मिळवला. विरोधी जनसेवा पॅनेलच्या उमेदवारांना मात्र सभासदांनी नाकारले.

नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी सायंकाळी सहकार सभागृहात जाहीर करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारनिहाय पडलेली मते, तसेच विरोधी जनसेवा पॅनेलच्या अनामत रक्कम जप्त झालेल्या उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यानंतर गांधी व कासट यांची मिरवणूक काढण्यात आली. सभागृहात नवनिर्वाचित संचालक मंडळासह सर्व सभासदांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. यावेळी गांधी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. गांधी यांच्या निवडीसाठी सुवालाल गुंदेचा यांनी सूचक म्हणून, तर अनुमोदन अनिल कोठारी यांनी दिले. उपाध्यक्ष कासट यांच्या निवडीसाठी शैलेश मुनोत यांनी सूचक म्हणून, तर अनुमोदन दीपक गांधी यांनी दिले. सत्ताधारी सहकार व विरोधी जनसेवा पॅनेल पूर्ण ताकदीने या निवडणूकीत उतरले होते. त्यामुळे बँकेच्या हजारो सभासदांसह नगरकरांचेही या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. मतमोजणीला मंगळवारी सकाळी सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. निकालाचे प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर झळकत होते. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. त्यात सुरुवातीपासूनच सहकार पॅनेल आघाडीवर होते. अखेरच्या फेरीनंतर सहकार मंडळाने एकहाती सत्ता मिळवल्याचे स्पष्ट झाले. त्यात सर्वाधिक मते सुरत शाखेचे दिनेश कटारिया यांना मिळाली.

विजयी उमेदवार व मिळालेली मते
राजेंद्र अग्रवाल १६८०४, अजय बोरा १८२३१, किशोर बोरा १७९७६, दिलीप गांधी १९६५१, दीपक गांधी १८०३८, सुवालाल गुंदेचा १९३६५, अॅड. केदार केसकर १६२४४, अनिल कोठारी १८२७७, संजय लुणिया १७७९४, शैलेश मुनोत १७९७८, दिनेश कटारिया १९९९५, राधावल्लभ कासट १७००४, अशोक कटारिया १८३९०, विजयकुमार मंडलेचा १६५९०, नवनित सुरपुरिया १६२४३, मनेष साठे १७५९०, साधना भंडारी १८२३२, मीना राठी १८६८१.

दिलेली आश्वासने पूर्ण करणार
सहकार सभागृहात झालेल्या पहिल्याच सभेत खासदार गांधी यांनी सभासदांचे आभार मानले. ते भाषणात म्हणाले, बँकेची ही निवडणूक म्हणजे मोठे आव्हान होते. विरोधकांनी अनेक आरोप केले. मात्र, सभासदांनी आम्हाला मोठ्या विश्वासाने व प्रचंड मताधिक्याने निवडून दिले. निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांच्या पुर्ततेसाठी तातडीने कामाला लागणार आल्याचे यावेळी नूतन अध्यक्ष व खासदार गांधी यांनी स्पष्ट केले.