आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘यूज अँड थ्रो’मुळे उभा प्लास्टिकचा राक्षस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर शहरात कच-याने भस्मासुराचे रूप घेतले आहे. ठिकठिकाणी हा राक्षस ओसंडून वाहताना दिसतो. त्यात प्रामुख्याने प्लास्टिकच्या वस्तूंचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो. त्यातही आताच्या चंगळवादी ‘यूज अँड थ्रो’ संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करणा-या प्लास्टिक थर्माकोलच्या लहान मोठ्या-थाळ्या, पाण्याचे ग्लास, वाट्या यांचा समावेश वाढत आहे. या पदार्थांचे विघटन होण्यास शेकडो वर्षे लागतात. हा कचरा असाच वाढत राहिला, तर महापालिकाच काय, पण कोणतीही यंत्रणा त्याचे व्यवस्थापन करू शकणार नाही. त्यामुळे लग्न किंवा मोठ्या समारंभात प्लास्टिक थर्माकोलच्या थाळ्या किंवा ग्लास वापरणे थांबण्याची गरज आहे.

नगर शहरात जो कचरा निर्माण होतो, त्याच्या ६० ते ७० टक्के कचरा प्लास्टिक थर्माकोलचा आहे. तो रोजच्या रोज उचलणेही महापालिकेच्या यंत्रणेला शक्य होत नाही. त्यावर एक उपाय मनपाच्या कर्मचा-यांनी काढला आहे. तो म्हणजे, जाळण्याचा. शहरात दररोज सकाळी ठिकठिकाणी असा कचरा पेटलेला असतो. मग तासन् तास कचरा धुमसत राहतो. अनेकवेळा कचराकुंड्या तीन दिवसही धुमसत राहतात. त्यांतून निघणा-या धुराने परिसर व्यापून गेलेला असतो. प्लास्टिक किंवा थर्माकोल जाळल्यानंतर निर्माण होणा-या घातक धुरातील कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईडसारख्या विषारी धुराने नागरिकांची फुफ्फुसे भरत आहेत. त्यामुळे होणा-या श्वसनाच्या आजारांवरील उपचार दीर्घकालिन खर्चिक आहेत. या प्रकारांमुळे सकाळी फिरण्यासाठी आता शहराच्या बाहेर लांब जा, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.

पत्रावळ्यांचापर्यायच योग्य
नगरमध्येअशा वस्तू मिळणारी घाऊक विक्रीची किमान वीसहून अधिक मोठी दुकाने आहेत. शिवाय प्रत्येक जनरल स्टोअरमध्ये प्लास्टिकचे ग्लास लहान प्लेट मिळतातच. त्यामुळे या वस्तूंच्या विक्रीत मोठी उलाढाल होत असते. लग्नसराईत तर ही उलाढाल प्रचंड असते. लग्न किंवा मोठ्या समारंभात पूर्वी पळसाच्या पानांपासून बनवलेल्या पत्रावळ्या वापरल्या जात. आता मात्र त्यांची जागा प्लास्टिक किंवा थर्माकोलच्या ताटांनी घेतली आहे. दक्षिण भारतीय लोक आपल्यापेक्षा जास्त संस्कृतीप्रिय असल्याने त्यांच्याकडे लग्न इतर समारंभात केळीच्या पानावर जेवण वाढले जाते. आपल्याकडेही आताही पळसाच्या पानांच्या पत्रावळ्या बाजारात उपलब्ध आहेत. त्या गळतात म्हणून त्यांना आता खालच्या बाजूने कागदही लावलेला असतो. मात्र, त्या दिसायला अनाकर्षक असल्याने त्यांना मागणी कमी असल्याची माहिती समजली. शिवाय बुफे जेवणात त्यांचा उपयोग नसल्याची तक्रारही केली जाते. मात्र, त्या पर्यावरणपूरक आहेत. त्यामुळे त्यांचा वापर वाढणे गरजेचे आहे. जेथे शक्य आहे, तेथे जेवणाचे कंत्राट घेणा-याकडेच टिकाऊ थाळ्यांची व्यवस्था करण्यास सांगणे शक्य आहे. या पर्यायांचा विचार झाल्यास कच-याच्या समस्येवर मात करता येणे शक्य आहे.

सार्वजनिक बेशिस्तपणा हे समस्येचे मूळ
यासगळ्याचे मूळ आहे, आपल्या बेशिस्त-बेफिकीर वागण्यात. अगदी वाढदिवसाच्या कार्यक्रमालाही एकदा वापरून फेकून देण्याच्या वस्तू घरात मोठ्या प्रमाणात आणल्या जात आहेत. पळसाच्या पानांच्या पत्रावळ्या उपलब्ध असल्या, तरी प्लास्टिक पत्रावळ्यांनाच मागणी आहे. बिशप लॉईड कॉलनीतील महानगरपालिका कर्मचारी कचरा उचलून नेत नसल्याने नागरिकांना नाईलाजास्तव कचरा जाळावा लागतो. सावेडीतील जिल्हा क्रीडा संकुलात टाकलेला कचरा खाताना बक-यांचा कळप. विशेष म्हणजे महापालिकाच तेथे कचरा टाकते.

पळसाची झाडे दुर्मिळ
पूर्वीपळसाच्या झाडाच्या पानांपासून पत्रावळी द्रोण तयार व्हायचे. त्यापासून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध व्हायचा. वापर झाल्यानंतर या पत्रावळ्या द्रोणचे सहज विघटन होत असे. परंतु काही वर्षांपासून पळसाची झाडे दुर्मिळ झाली आहेत. परिणामी यूज अॅण्ड थ्रो प्लास्टिकचा वापर वाढला आहे. लग्नकार्य, वाढदिवस, तसेच इतर सर्वच कार्यक्रमांमध्ये सर्रास प्लास्टिक थर्माकोलच्या डिश ग्लासचा वापर होतो. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. पळसाची झाडे लावून त्यापासून पत्रावळी द्रोण तयार केल्यास हा प्रश्न सुटेल.

एक टक्काही विक्री नाही
नगरशहरातील सर्वच किराणा दुकानांमध्ये प्लास्टिक थर्माकोलच्या पत्रावळ्या मिळतात. मात्र, पर्यावरणपूरक पळसांच्या पानाच्या पत्रावळ्या हद्दपार झाल्या आहेत. किमतीतील फरक उपलब्धतेचा अभाव यामुळे या पत्रावळ्यांना मागणीच नसल्याची माहिती संबंधित दुकानदारांनी "दिव्य मराठी'शी बोलताना दिली. या क्षेत्रात होणा-या एकूण उलाढालीच्या एक टक्काही पर्यावरणपूरक साहित्य विकले जात नसल्याचे त्यांनी कबूल केले. पूर्वी मागणीप्रमाणे पुरवठा होत असायचा. मात्र, आता मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने हे साहित्यच ठेवत नसल्याचे त्यांनी सांगितले.

हरित न्यायालयात दाद मागणार
हरियाली संस्थेच्या वतीने दोन वर्षांपूर्वी ३० लग्नसमारंभांचा सर्व्हे केला असता १८ ठिकाणी थर्माकोलच्या पत्रावळ्या वापरल्याचे आढळले. त्यांचे विघटन होत नसल्याने वायू प्रदूषण निर्माण होते. आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. या पत्रावळ्यांच्या उत्पादन, विक्री वापरावर बंदी आणावी, अशी मागणी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली. त्याबाबत कार्यवाही झाल्याने हरित न्यायालयात दाद मागणार आहे.'' सुरेशखामकर, अध्यक्ष,हरियाली संस्था.

जनजागृतीसाठी संस्थांची नेमणूक
५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांची विक्री वापर करणा-यांवर कारवाई सुरू आहे. आतापर्यंत ५० ते ६० विक्रेत्यांकडील प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. यापुढेही कारवाई सुरूच राहील. प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच काही संस्थांची नेमणूक करण्यात येणार आहे. नागरिकांनी यूज अॅण्ड थ्रो प्लास्टिकचा वापर टाळवा. तसे झाल्यास हा प्रश्न लवकर सुटेल.'' डॉ.एन. एस. पैठणकर, घनकचराव्यवस्थापन प्रमुख, मनपा.

'यूज अॅण्ड थ्रो'चा वापर टाळा
शहरातीलकच-याचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेच्या वतीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. बुरूडगाव येथे लवकरच कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू होईल. प्लास्टिक पिशव्यांचा वापर उत्पादन करणा-यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही यूज अॅण्ड थ्रो प्लास्टिकचा वापर टाळणे आवश्यक आहे. नगर शहर स्वच्छ सुंदर करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान गरजेचे आहे.'' संग्रामजगताप, आमदार तथा महापौर.

प्लास्टिकवर बहिष्कार घालावा
प्रत्येक गोष्टीची जबाबदारी शासनाचीच आहे, असे म्हणून चालणार नाही. आपण कर भरतो, म्हणजे आपल्याला कचरा निर्मितीचा परवाना दिलेला नाही. प्लास्टिकमुळे आरोग्य पर्यावरण दोन्हीही धोक्यात आले आहे, याची जाणीव ठेवून नागरिकांनी जागरूक व्हावे. त्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन प्लास्टिकच्या वस्तू वापरण्यावर बहिष्कार घालावा, तरच हा प्रश्न सुटेल.'' पोपटरावपवार, सामाजिककार्यकर्ते, हिवरेबाजार.

थर्माकोलवर बंदी हवी
दैनंदिन वापराच्या वस्तूंमध्ये प्लास्टिक थर्माकोलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांची कच-यात भर पडत असून त्याचे आरोग्यासह पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे आता शासनानेच प्लास्टिकच्या पत्रावळ्या पिशव्या निर्मितीवर बंदी घालायला हवी. प्लास्टिकमध्ये विक्रीला येणा-या रेडिफूडवरही बंदी घालण्यात यावी. प्रत्येक गोष्ट सोपी असावी, या हव्यासापोटीच प्लास्टिकचा वापर वाढला आहे. नागरिकांनीच आता पुढाकार घेऊन प्लास्टिकला नकार द्यावा.'' राजेंद्रनिंबाळकर, सामाजिककार्यकर्ते, नगर,

पिशव्यांमधील पदार्थ खाऊ नका
प्लास्टिकचाकचरा जाळल्यानंतर बाहेर पडणारे विषारी वायू आरोग्याला अपायकारक आहेत. त्यामुळे श्वसनाचे आजार वाढतात. हा कचरा पुरल्यानंतरही त्याचे वर्षानुवर्षे विघटन होत नाही. आपण प्लास्टिकच्या पॅकिंग पिशव्यांमध्ये साठवलेले खाद्यपदार्थ खातो. असे पदार्थ खाल्ल्यामुळे अल्झायमरसारख्या आजाराला सामोरे जावे लागते. याचे गंभीर परिणाम नाकापासून ते फुफ्फुसापर्यंत होतात. त्यामुळे प्लास्टिकचा वापर थांबवा.'' डॉ.धनंजय कुलकर्णी, कान-नाक-घसातज्ज्ञ, सावेडी.