आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्योतिष शास्त्राचा उपयोग केवळ अर्थार्जनासाठी होऊ नये- ज्योतिषाचार्य भालेराव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- भारतीय संस्कृतीत शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद या शास्त्रांप्रमाणेच ज्योतिष हेही प्राचीन व महत्त्वाचे शास्त्र असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ग्रह, नक्षत्रांच्या आधारे तर्कशास्त्रावर आधारित सिद्धांत त्यात मांडलेले आहेत.
पूर्वसुरींनी हे सिद्धांत पारखून घेतलेले आहेत. मात्र, या शास्त्राचा वापर अभ्यासपूर्वकच झाला पाहिजे, केवळ अर्थार्जनासाठी नको, असे मत वांबोरी (ता. राहुरी) येथील ज्योतिषाचार्य मनोहर अनंत भालेराव यांनी गुरुवारी व्यक्त केले.
मकर संक्रांतीच्या निमित्ताने "दिव्य मराठी'ने भालेराव यांच्याशी संवाद साधला. विविध उदाहरणे आणि अनुभव सांगत त्यांनी ज्योतिष हे शास्त्र म्हणून कसे महत्त्वपूर्ण आहे हे स्पष्ट केले. खगोलशास्र, गणित आणि तर्कशास्त्र अशा अनेक गोष्टींचा वापर ज्योतिषशास्त्रात झाला आहे. चंद्रोदय, सूर्योदय एवढेच नव्हे, तर भविष्यात होणाऱ्या चंद्र व सूर्यग्रहणांच्या वेळा ज्याअर्थी पंचांगामध्ये अचूक दिलेल्या असतात, त्याअर्थी हे अतिशय प्रगत आणि सिद्ध झालेले शास्त्र आहे, असे ते म्हणाले.
तरुणपणी अतिशय खडतर कष्ट करून, प्रसंगी ऊसतोडणी मजूर म्हणून काम केलेल्या भालेराव यांनी पोस्ट खात्यात दीर्घकाळ सेवा केली. या काळात त्यांनी अनेक मुलांना शिक्षणासाठी मदत केली. वांबोरी येथे पोस्टमास्तर म्हणून निवृत्त झाल्यावर ते तेथेच स्थायिक झाले. निवृत्तीनंतर भालेराव यांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू केला. त्यासाठी अनेक ग्रंथांचे वाचन केले. शुद्ध निरयन पद्धतीच्या पंचांगांच्या आधारे ते ज्योतिष कथन करतात. व. दा. भट, देशिंगकर, दाते अशा अनेकांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी या पद्धतीचे सखोल अध्ययन केले आहे. आयन बिंदू (अक्षांश-रेखांश), तसेच जन्मस्थळ, जन्मवेळ यांचा विचार यात महत्त्वाचा असतो. मुलाचा जन्म म्हणजे प्रसूतीची क्रिया जेव्हा सुरू होते, ती वेळ अचूक नोंदवलेली असल्यास ७० ते ७५ टक्के तर्क खरे ठरतात. मात्र, बऱ्याचदा प्रसूती पूर्ण झाल्यानंतरची वेळ नोंदवली जाते. त्यामुळे अनुमानात फरक पडतो. जन्माच्या वेळी ग्रह व नक्षत्रांच्या स्थानावर मनुष्याचा स्वभाव ठरतो, असे ज्योतिषाचार्य भालेराव यांचे म्हणणे आहे.
ज्योतिषशास्त्र अंधश्रद्धा निर्माण करत नाही, तर मनुष्यावर संस्कार करून त्याच्या जीवनाला योग्य वळण लावते, असे भालेराव म्हणाले. ज्योतिषाच्या आधारे तुम्हाला पुढे काय घडणार आहे, याचे संकेत मिळतात. रस्त्यावरचा सिग्नल जसा तुम्हाला योग्य सूचना देतो, तेच काम ज्योतिषशास्त्र करत असते. आपल्या आयुष्यात घडणारी एखादी घटना टाळता येत नाही, पण तुम्ही योग्य काळजी घेतली, तर तिची तीव्रता कमी होऊ शकते. तुमची मानसिक तयारी असली तर तुम्ही संकटाला चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकता, असे त्यांनी सांगितले.
सध्या काहींनी ज्योतिषाचा बाजार मांडला आहे. त्याबद्दल खंत व्यक्त करून भालेराव म्हणाले, स्फटिके, रत्न, हिरे यांच्या नावाखाली साधे खडे देऊन पैसे उकळण्याचे प्रकार शहरांमध्ये वाढले आहेत. विविध प्रसारमाध्यमात कथन केले जाणारे भविष्यही तितकेसे विश्वासार्ह नसते. कारण भविष्य हा व्यक्तिगत विषय असून प्रत्येक व्यक्तिगणिक ते वेगळे असते. हल्ली अनेक ठिकाणी संगणकावर जन्मकुंडली तयार करून मिळते. पण त्यात बऱ्याचदा गडबडगुंडा असतो. नेमकी विधाने नसल्याने गाभा कळत नाही. नीट अभ्यास करून जन्मपत्रिका तयार करायला किमान एक दिवस लागतो, असे भालेराव म्हणाले.

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रामाणिक ज्योतिषांना भीती वाटण्याचे काहीच कारण नाही. यात कोणाची फसवणूक नाही की शोषण नाही. अंधश्रद्धा निर्मूलनाचा डंका वाजवणारे दुटप्पी असतात. ते घरी देवाला नमस्कार करतात आणि बाहेर वेगळेच बोलतात, असे भालेराव म्हणाले. भालेराव यांना मराठी, संस्कृत, हिंदी या भाषांबरोबर गुजराथी आणि उर्दूही येते. त्याचा फायदा त्यांना ज्योतिषशास्त्राचा व्यासंग वाढवण्यासाठी झाला आहे.

डॉ. भागवतांची आठवण
नगर शहरातील आनंदी बाजारात दवाखाना असलेले डॉ. भागवत हे ज्योतिषशास्त्राचे मोठे अभ्यासक होते. सत्तरच्या दशकांत त्यांचे ज्योतिषशास्त्रावरील लेख लाइफ, स्पॅनसारख्या आंतरराष्ट्रीय मान्यता असलेल्या मासिकांत प्रसिद्ध होत असत, अशी आठवण भालेराव यांनी सांगितली.