आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uttam Kambale News In Marathi, Journalist, Marathi Literature, Divya Marathi

विद्यार्थ्यांनी समाजाशी संवाद साधावा- उत्तम कांबळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी - कृषी शिक्षणात मिळालेला प्रवेश ही सुवर्णसंधी असून या संधीचे सोने करा. महात्मा जोतिराव फुलेंच्या शेतकर्‍यांवरील कादंबर्‍या वाचा. फुले वाचल्याशिवाय शेतकरी कळणार नाही. शिक्षणाचा चौकटीबाहेर जाऊन शेतकर्‍यांशी, समाजाशी संवाद साधा, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले.


महात्मा फुले कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात कांबळे बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे होते. मंचावर संचालक संशोधन डॉ. राजेंद्र पाटील, सहयोगी अधिष्ठाता डॉ. भीमराव उल्मेक, कुलसचिव सुनील वानखेडे, नियंत्रक पोपट कर्डिले, विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. राजीव नाईक, विद्यार्थी कल्याण अधिकारी शरद पाटील, डॉ. राजेंद्र वाघ, विद्यार्थी परिषद सभापती मुक्ता टेकाळे, निमंत्रक अभय गायकवाड उपस्थित होते.


कांबळे म्हणाले, धावत्या जगात मनुष्य आणि वस्तूंची स्पर्धा सुरू आहे. ज्या माणसांचे मातीशी घट्ट नाते आहे तेच या स्पर्धेत यशस्वी होतात. स्पर्धेशिवाय आयुष्य घडत नाही. जगण्याला कारण असेल तर जगणे सुंदर बनते. शिक्षणातून आपली ओळख मिळवावी. या वेळी त्यांनी बुद्ध, आंबेडकर, फुले, मीराबाई, सॉक्रेटिस, न्यूटन, गुरुनानक यांच्या आयुष्यातील दिशादर्शक घटना सांगून ध्येय स्पष्ट ठेवण्याचा संदेश दिला.


प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख अधिष्ठाता डॉ. उल्मेक यांनी करून दिली. मान्यवरांच्या हस्ते कृषिगंध या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. सन 2013-14 साठी सवरेत्कृष्ट विद्यार्थी म्हणून भगवान वालझडे यांना, तर पीएचडीचा सवरेत्कृष्ट विद्यार्थी म्हणून प्रमोद मगर यांना मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. अहवाल वाचन मुक्ता टेकाळे यांनी केले. सूत्रसंचालन सुवर्णा केळकर आणि उल्हास राक्षे यांनी केले. आभार अमित शिंदे यांनी मानले.


महात्मा फुले कृषी विद्यापीठ देशातील सवरेत्तम विद्यापीठ असून शेतकर्‍यांच्या गरजेनुसार येथे संशोधन होते. या विद्यापीठाने आतापर्यंत 211 पेक्षा अधिक पिकांचे वाण विकसित केले असून एक हजाराहून अधिक पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारशी शेतकर्‍यांसाठी प्रसारित केल्या आहेत. जग प्रचंड वेगाने बदलत असून या बदलत्या जगात समरसून जाण्याची क्षमता हे विद्यापीठ विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करत आहे. डॉ. तुकाराम मोरे, कुलगुरू, मफुकृवि, राहुरी.