आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनागोंदी कारभारामुळे मनपा तिजोरीत खडखडाट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष करून दुरुस्तीवर उधळपट्टी सुरू आहे, असा आरोप सन्माननीय नागरिक प्रतिष्ठानच्या वतीने आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
मनपा प्रशासनाकडून करवाढीचे संकेत देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठानने निवेदन देऊन मनपा प्रशासनाचा अनागोंदी कारभार निदर्शनास आणून दिला आहे. कामांचा निकृष्ट दर्जा व त्यामुळे अशा कामांवर दुरुस्तीसाठी वारंवार करण्यात येणारा खर्च, कामे झालेली नसतानाही संगनमताने ठेकेदाराला देयके अदा करणे आदींमुळे मनपाच्या उत्पन्नाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे.

मनपाच्या मालकीच्या इमारती रिकामी न ठेवण्याची खबरदारी घेणे, ही अधिका-यांची जबाबदारी आहे. मात्र, अधिका-यांच्या निवासस्थानात कर्मचारी ठेवण्यात आले असून त्यांच्याकडून देखभाल खर्चही वसूल होत नाही. आयुक्त स्वत:च देखभाल खर्च भरत नसल्याने इतर अधिकारी व कर्मचारी त्यांचेच अनुकरण करतात. मनपाचा पगार घेणारे शेकडो कर्मचारी कामावर हजर नसतात. आयुक्तांसह मनपाशी संबंध नसणा-या वरिष्ठ अधिकारी व पदाधिका-यांच्या घरी कर्मचा-यांना राबवण्यात येते. अधिका-यांकडूनच असा अनागोंदी कारभार सुरू असल्याने उत्पन्नात वाढ करू शकणा-या बाबींकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात येत आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कामावर न येणारे व अधिका-यांच्या घरी राबणारे कर्मचारी योग्य ठिकाणी योग्य कामावर लावले, तर उत्पन्नाचा स्त्रोत वाढण्याबरोबर खर्चात बचत शक्य आहे. कामचुकार कर्मचा-यांना मोकाट सोडून देशपांडे हॉस्पिटलमध्ये खासगी सुरक्षारक्षकांवर खर्च करण्यात येत आहे. कर्मचा-यांचा सुयोग्य उपयोग केल्यास रस्ता बाजू कर संकलनाचे खासगीकरण करण्याची गरज पडली नसती. माळीकाम करणा-या कर्मचा-यांकडून स्वत:च्या बंगल्याचे सुशोभीकरण करण्याऐवजी उद्याने विकसित केली, तर उत्पन्नाच्या साधनांबरोबरच नगरकरांनाही फायदा होईल. अपवाद वगळता आजी-माजी अधिका-यांनी देय नसलेल्या सवलतींचा मनपाकडून लाभ घेतला आहे. सर्व सुविधांचा स्तर खालावत असताना करांचा बोजा उंचावत आहे. नगरकर कोणतीही करवाढ सहन करणार नाहीत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

इच्छाशक्तीच नाही...
करयोग्य बाबींवर कर लावण्याकडे सूचना करूनही प्रशासनाने वेळोवेळी दुर्लक्ष केले. उत्पन्नवाढीसाठी विविध उपाययोजना शक्य आहेत. मात्र, उपलब्ध साधनांचाच नियोजनपूर्ण वापर होत नाही. उत्पन्नवाढीच्या स्त्रोतांबाबत खुली चर्चा करून उपाययोजना सूचवण्याची आमची तयारी आहे. तशी सूचना यापूर्वीही केली होती. मात्र, अधिका-यांचीच इच्छाशक्ती नाही. कोणत्याही परिस्थितीत नगर शहरातील जनता करवाढ सहन करणार नाही.''
प्रमोद मोहोळे, अध्यक्ष, सन्माननीय नागरिक प्रतिष्ठान.