आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई - वडगाव पान टोलनाक्यावरील वसुली बंद करण्याचा बांधकाम विभागाचा प्रस्ताव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - कोल्हार - घोटी राज्यमार्गावरील वडगावपान येथील पथकरनाका निविदेतील अटींचे उल्लंघन करून सुरू आहे. उद्योजक अटींप्रमाणे कामांची पूर्तता करण्यास सहा वर्षांपासून टाळाटाळ करीत असल्याने बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता अरविंद सूर्यवंशी यांनी या नाक्यावरची पथकर वसुली बंद करण्याचा प्रस्ताव 15 दिवसांपूर्वी वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे. त्यामुळे या नाक्यावर नियमबाह्यरीत्या होत असलेली पथकराची वसुली बंद होण्याचे संकेत आहेत.

संगमनेरनजीक वडगाव पान येथे संगमनेर-लोणी-कोल्हार रस्त्याच्या सुधारणेचे काम खासगीकरणातून करण्यात आले. औरंगाबादच्या रुद्राणी कन्स्ट्रक्शनने हे काम केले आहे. 20 फेब्रुवारी 2006 मध्ये या कामासंदर्भात तात्पुरते पूर्णत्वाचे प्रमाणपत्र बांधकाम विभागाने दिल्यानंतर लगेचच 5 मार्चला संबंधितांनी पथकर वसुलीला सुरुवात केली. 30 जून 2016 अखेर पथकराची वसुली येथे सुरूच राहणार आहे. दरम्यान, या राज्यमार्गावर पथकराची वसुली होत असली, तरी उद्योजकाने या कामात ठेवलेल्या त्रुटी आजही कायम आहेत. रस्त्याची अवस्था अतिशय बिकट असून त्याची दुरुस्ती केली जात नाही. गेल्या सहा वर्षांत बांधकाम विभागानेही वारंवार उद्योजक व वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार करून त्रुटींची पूर्तता करण्याबाबत पाठपुरावा केला. तब्बल चौदा वेळा पत्रव्यवहार करतानाच एकदा नोटीसही दिली आहे. मात्र, त्याचा फारसा परिणाम संबंधित उद्योजकावर झाला नाही. तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी करून रस्ता वाहतुकीला आलबेल असल्याचे दाखवले. कोल्हार ते संगमनेरपर्यंतच्या अंतरावर वाहनांचे अपघातही झाल्याचे प्रकार घडले असून त्यात निरपराधांचे बळीही गेले आहेत. जिल्ह्यातील सुपा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सी. टी. धाकराव यांचाही या मार्गावरील अपघातात काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला.
पथकर नाकाचालकाकडून होत असलेल्या अडवणुकीच्या विरोधात व रस्त्याच्या दुरुस्तीसाठी विविध पक्ष, संघटनांकडून आंदोलनेही करण्यात आली. मात्र, त्याचाही परिणाम उद्योजकावर झाला नाही. गेल्या महिन्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने राष्ट्रीय सचिव अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही हा पथकर नाका बंद करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते; पथकर नाकाचालकाने स्वत: येथे पथकर वसुली न करता दुसर्‍याच त्रयस्थ व्यक्तीला हा नाका चालवण्यास दिला आहे.
टोलनाक्यावर आहेत अनेक त्रुटी - पथकर वसुली सुरू होऊन सहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला असून अद्याप मूळ निविदेतील शर्तीनुसार कामांची पूर्तता झालेली नाही. संगमनेर ते लोणी व लोणी ते कोल्हार या रस्त्यावर डांबरी पृष्ठभागाला खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या साइडपट्टय़ा आवश्यक तेथे तासण्यात अथवा भरण्यात आलेल्या नाहीत. रस्त्याच्या कडेला गटारी पुरेशा खोल करण्यात आलेल्या नाहीत. रस्त्याच्या दुतर्फा वेड्या बाभळी, काटेरी झुडपे काढण्यात आलेली नाही. ’’अरविंद सूर्यवंशी, अभियंता, बांधकाम विभाग.